बांगलादेशवर भारी पडलं ‘जैसबॉल’, दुसऱ्या डावातही यशस्वीने केली धुलाई
भारताने बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामनाही खिशात घातला आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने कमाल केली. आतापर्यंतच्या कसोटी इतिहासात जे कधी घडलं नव्हतं ते करून दाखवलं आहे. यात डावखुऱ्या यशस्वी जयस्वालचा सिंहाचा वाटा राहिला. संघाला आक्रमक खेळी करून देत दोन्ही डावात अर्धशतक ठोकलं.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका भारताने 2-0 ने जिंकत बांगलादेशला व्हाईटवॉश दिला. या विजयामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल पाचवा दिवशी असा लागेल याचा कोणी विचारही केला नव्हता. कारण पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दोन दिवसात निकाल लागेल अशी काही वाटत नव्हतं. पण भारतीय गोलंदाज आणि फलंदाज यांनी जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाजांनी पहिल्यांदा आपली भूमिका चोखपणे बजावली. त्यानंतर फलंदाजांनी आपला आक्रमक अंदाज दाखवला. पहिल्या डावात बांगलादेशने 233 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करत अवघ्या 35 षटकात 285 धघावा केल्या आणि 52 धावांची आघाडी घेतली. यात सिंहाचा वाटा राहिला तो यशस्वी जयस्वालचा..त्याने पहिल्या डावात 51 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 72 धावा केल्या. यात त्याचा स्ट्राईक रेट हा 141.18 इतका होता. यशस्वी जयस्वाल दुसऱ्या डावातही चमकला. आक्रमक अंदाज त्याने कायम ठेवत दुसऱ्यांदा अर्धशतक झळकावलं.
यशस्वी जयस्वालने 43 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. यावेली त्याचा स्ट्राईक रेट हा 116.28 इतका होता. विजयासाठी अवघ्या 3 धावा असताना यशस्वी जयस्वाल हसन मिराजच्या गोलंदाजीवर झेल देत बाद झाला. त्याने 45 चेंडूत 51 धावांची खेळी केली. खरं तर या कसोटी मालिकेपूर्वी यशस्वी जयस्वाल फॉर्मसाठी झुंजत होता. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत काही खास करू शकला नव्हता. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं. पण त्याला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात सूर गवसला आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. दुसऱ्या सामन्यातील चांगल्या कामगिरीसाठी यशस्वी जयस्वालला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेत भारताला अजून 8 सामने खळायचे आहेत. यापैकी तीन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. तर पाच सामन्यांची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. त्यामुळे पुढचं सर्व गणित पाहता यशस्वी जयस्वालचा फॉर्म खूपच महत्त्वाचा होता. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार डावात यशस्वी जयस्वालने 3 अर्धशतकं झळकावली.