विराट कोहलीच्या पावलावर पाऊल टाकणार बाबर ? दिग्गज भारतीय खेळाडूने दिला आयुष्य खास सल्ला
सतत फ्लॉप होत असलेल्या पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला भारताच्या माजी दिग्गज खेळाडूने एक मोठा सल्ला दिला आहे. काही काळापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ओपनिंग करणाऱ्या बाबरबद्दल या क्रिकेटपटूने नेमकं काय म्हटलं, त्याचा कोहलीशी काय संबंध ? चला जाणून घेऊया.

पाकिस्तानचा दणदणीत पराभव आणि चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडल्यानंतर स्टार फलंदाज बाबर आझमला टीकेचा सामना करावा लागत आहे. तो दीर्घकाळ कोणतीही मोठी खेळी खेळू शकलेला नाही आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दोन्ही सामन्यांमध्ये (न्यूझीलंड आणि भारताविरुद्ध) त्याची कामगिरीही निराशाजनक होती. यामुळेच बाबर आझम हा सतत पाकिस्तानी चाहते आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर असतो. मात्र, याच कठीण परिस्थितीत आता भारताच्या एका दिग्गज माजी खेळाडूने बाबरला महत्वाचा सल्ला दिला आहे. बाबरने वनडे क्रिकेटमध्ये ओपनिंग करू नये तर तिसऱ्या क्रमांकावर यायला हवे, असे मत सुनील गावस्कर यांनी मांडलं आहे.
सुनील गावस्कर यांचा बाबरला खास सल्ला
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बसील अली यांच्याशी सुनील गावस्कर यांनी यूट्यूब चॅनलवर चर्चा केली. यादरम्यान बासित यांनी गावसकर यांना सांगितले की, बाबरने तिरंगी मालिकेत आतापर्यंत सलामी दिली आहे. त्यामुळे बाबर ओपनिंगला येणे हा योग्य निर्णय आहे असे तुम्हाला वाटते का ? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर गावस्कर म्हणाले, टी-20 मध्ये हे अगदी योग्य आहे. कारण तुमच्याकडे जो सर्वात चांगला फलंदाज आहे, त्याला जितकी जास्त षटके खेलायला मिळतील तेवढं उत्तम असतं.
पण वनडे मॅचबद्दल गावस्कर यांचं मत वेगळं आहे. वनडे सामन्यामध्ये बाबरने तिसऱ्या स्थानी फलंदाजीला यावं असं ते म्हणाले. बाबरसाठी 50 षटकांत तिसऱ्या क्रमांकाला खेळायला येणं ही स्थिती चांगली असेल. कारण पांढरा चेंडू 10 ते 12 षटकांसाठी स्विंग किंवा सीम होतो आणि त्यातच तो भारताविरुद्ध बाद झाला. जर तो तिसऱ्या क्रमांकावर आला आणि 14-15 षटकात फलंदाजीला केली असती तर कदाचित ही अडचण आली नसती आणि त्याला धावा करता आल्या असत्या. त्याला सलामीलाच का खेळायला पाठवलं हे पाकिस्तानी टीम, सिलेक्शन टीमलाचा ठाऊक असेल. विशेष म्हणजे विराट कोहली हाही तिसऱ्या स्थानी फलंदाजी करायला येतो. त्यामुळे आता बाबर हा कोहलीच्या पावलावर पाऊल टाकतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल.
त्याला या अवस्थेत पाहून वाईट वाटते
नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत बाबर आझम सतत फ्लॉप ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 64 धावा केल्या होत्या, मात्र त्यासाठी त्याने 90 चेंडू खेळले होते. तर भारताविरुद्ध त्याला 26 चेंडूत केवळ 23 धावा करता आल्या. पाकिस्तानी खेळाडू अहमद शहजादनेही बाबरवर मोठे वक्तव्य केले. इंडिया टुडेशी बोलताना अहमद शहजाद म्हणाले की बाबर आझमची अशी अवस्था पाहून मला वाईट वाटते. जेव्हा तो नवीन होता तेव्हा असे वाटत होते की तो सर्व रेकॉर्ड मोडेल पण आता तसे नाही. कोणताही खेळाडू इतके दिवस अपयशी ठरू शकत नाही,असे मत त्यांनी मांडले.
