Champions Trophy 2025 : पाकिस्तानचा माजी खेळाडू टीम इंडियावर नाराज, मोठं कारण समोर; खेळाडूंना काय दिला कानमंत्र?
चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरूवात होत असून पाकिस्तानकडे यंदा यजमानपद आहे. अनेक सामने हे पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत पण भारतीय संघल मात्र पाकिस्तानात जाणार नाहीये. भारताचे सर्व सामने हे दुबईत खेलवले जातील. भारतीय संघ पाकिस्तानला न आल्याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

आजपासून अर्थात 19 फेब्रुवारी 2025 पासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला सुरूवात होत असून पहिला सामना हा यजमान पाकिस्तान वि न्युझीलंड असा रंगणार आहे. तर पाकिस्तान आणि भारताचा सामनाही लवकरच होणार आहे. मात्र त्यापूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू, शाहिद आफ्रिदीने त्यांच्या संघाला काही सूचना दिल्या आहे. भारतासह इतर सर्व टीम्सना हरवण्यासाठी आफ्रिदीने खास ‘गुरूमंत्र दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे अनेक सामने पाकिस्तानमध्ये खेळण्यात येणार आहेत, मात्र भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही. भारातचे सर्व सामने हे दुबईतच होतील. यावरूनही आफ्रिदीने नाराजी व्यक्त केली.
भारत पाकिस्तानला येणार नाही, काय म्हणाला आफ्रिदी ?
एका कार्यक्रमादरम्यान आफ्रिदीला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘ भारतीय संघ ( पाकिस्तानात) नाही आला. त्यांना यायचं नसेल तर आता मी काय बोलू शकतो. खरंतर जेव्हा जगातील सगळे संघ इथे (पाकिस्तानात) येत आहेत, तर त्यांनीही यायला हवं होतं, भारतीय संघ का येत नाहीये ?असा सवाल त्यांनी विचारला. टीम इंडिया कुठेही खेळत असली तरी भारताविरोधात चांगली कामगिरी करणं हे पाकिस्तानी संघाचं काम आहे. भारताविरोधात विजय मिळवणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या देशातील पाच सहा शहरं असे आहेत की, जिथे विजयानंतर सर्वजण पाकिस्तानच्या झेंड्याखाली एकत्र येऊन जल्लोष करतात. त्यामुळे टीम इंडियाविरोधात खेळताना पाकिस्तानी संघ आणि टीममधील प्रत्येक खेळाडूवर महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे, असं मला वाटतं’ असं आफ्रिदी म्हणाला.
आफ्रिदीने खेळाडूंना दिला खास ‘गुरूमंत्र’
यावेळी बोलताना आफ्रिदीने पाकिस्तानी खेळाडूंना खास गुरूमंत्रही दिला. ” चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलायचं झालं तर सगळेच संघ पूर्ण तयारीनिशी येतात. त्यामुळेच पाकिस्तानी संघाला बॅटिंग, बॉलिंग आणि फील्डिंग या तीनही क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली पाहिजे. तेव्हाच तुम्ही सामना जिंकू शकता. भारत असो की बांग्लादेश किंवा न्युझीलंड, हे सगळेच उत्तम संघ आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानी संघाने मजल मारावी अशी माझी इच्छा आहे, पण त्यासाठी तिन्ही क्षेत्रात संघाला उत्तम परफॉर्मन्स द्यावा लागेल ” अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.
टीम कॉम्बिनेशनमुळे नाराज ?
एकीकडे खेळाडूंना जिंकण्यासाठी कानमंत्र दिला असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील खेळाडूंच्या स्क्वॉडमुळे आफ्रिदी नाराज असल्याचेल समजते. त्याने कोणाचेही नाव न घेता संघात जे एक-दोन खेळाडू आहेत, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘हा 11 आणि 15 खेळाडूंचा संघ आहे. मी एक किंवा दोन खेळाडूंबद्दल नक्कीच बोलू शकतो, ते का आणि कुठून आले? पण मी कोणाचंही नाव घेणार नाही. आता अवघ्या काही वेळातच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होणार आहे त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं हे आपलं आणि मीडियाचं काम आहे. याविषयावर नंतरही बोलू शकतो, असं आफ्रिदी म्हणाले.