भारत वि. न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द, आता पुढे काय?

पावसामुळे नाणेफेकही करता आली नाही. यामुळे इंग्लंडमध्ये सामना पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांची मोठी निराशा झाली आहे. सामन्याची सुरुवात तर दूरच, पण नाणेफेकही करता आली नाही.

भारत वि. न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द, आता पुढे काय?

लंडन : विश्वचषकामध्ये पावसाचा व्यत्यय सुरुच आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ आली. दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आलाय. भारताकडे विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. पण पावसामुळे नाणेफेकही करता आली नाही. यामुळे इंग्लंडमध्ये सामना पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांची मोठी निराशा झाली आहे. सामन्याची सुरुवात तर दूरच, पण नाणेफेकही करता आली नाही.

सामना सुरु करण्यासाठी ग्राऊंड स्टाफकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. पंचही मैदानात आले आणि पाहणी केली. पण काही क्षणातच पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पावसाने उसंत न घेतल्याने अखेर सामना रद्द करण्याची वेळ आली. 20 षटकांचा सामना होईल, असं बोललं जात होतं. पण एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.

विश्वचषकात खेळत असलेल्या 10 संघांच्या गुणतालिकेत भारत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा पहिला क्रमांक कायम आहे. भारताच्या खात्यात 3 सामन्यांमध्ये 5, तर न्यूझीलंडच्या खात्यात 4 सामन्यांमध्ये 7 गुण आहेत. आजचा सामना जिंकून भारताला दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियालाही मागे टाकण्याची संधी होती. भारताचा पुढचा सामना 16 तारखेला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

विश्वचषकात आतापर्यंत पावसामुळे रद्द झालेले सामने

इंग्लंडमध्ये पाऊस क्रिकेटची कधीही पाठ सोडत नाही. यापूर्वीही अनेकदा विश्वचषकात सामने रद्द करण्याची वेळ आली आहे. 1979 मध्ये ओव्हलच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. 2015 मध्ये ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. तर यावर्षी ब्रिस्टलमध्ये श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना वाया गेला. यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *