आयपीएल लिलाव : पुन्हा पैशांचा पाऊस पडणार, या दिग्गजांचं काय होणार?

आयपीएल लिलाव : पुन्हा पैशांचा पाऊस पडणार, या दिग्गजांचं काय होणार?

मुंबई : आगामी आयपीएल मोसमासाठी पुन्हा एकदा बोली लागणार आहे. खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे तर काही खेळाडूंच्या मनात धाकधूक आहे. युवराज सिंहसारख्या दिग्गज खेळाडूंनाही कुणी खरेदीदार मिळणार का याकडे लक्ष लागलंय. फॉर्मात असताना युवराजवर 16 कोटींची बोली लावली होती, पण गेल्या मोसमात त्याच्यावर बोली लावण्यास कुणीही उत्सुक नव्हतं. बेस प्राईस दोन कोटींमध्ये त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळावं लागलं होतं.

युवराजने यावेळी स्वतःला एक कोटींच्या बेस प्राईस लिस्टमध्ये ठेवलं आहे. या यादीत रिद्धीमान साहा, अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी यांचाही समावेश आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये दुपारी अडीच वाजता लिलाव सुरु होईल. लिलावाचं सूत्रसंचलन करणारे रिचर्ड मेडले यावेळी दिसणार नाहीत. ही जबाबदारी ह्यू अॅडमिडस यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे दोन कोटींच्या बेस प्राईस लिस्टमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. ब्रँडम मॅक्युलम, ख्रिस वोक्स, लसिथ मलिंगा, शॉन मार्श, सॅम करन, कुलिन इंग्राम, कोरी अँडरस, अँजेलो मॅथ्यूज आणि डार्सी शॉर्ट या नऊ परदेशी खेळाडूंच्या या यादीत समावेश आहे. 1.5 कोटींच्या बेस प्राईसमध्ये सहभागी असलेले डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, जॉनी बेअरस्टो, अॅलेक्स हेल्स यांना फ्रँचायझी पसंती देतील अशी शक्यता आहे.

या लिलावात 346 पैकी 70 खेळाडूंची खरेदी केली जाऊ शकते, ज्यात परदेशी खेळाडूंसाठी 20 जागा आहेत. भारतीय कसोटी संघात सध्या फॉर्मात असलेले चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यांनी स्वतःला अनुक्रमे 50 लाख आणि 75 लाख रुपये बेस प्राईसच्या श्रेणीमध्ये ठेवलं आहे.

आयपीएल संपल्यानंतर लगेच 30 मे 2019 पासून वन डे विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे अॅरॉन फिंच, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारख्या अनेक खेळाडूंनी आयपीएलमधून आपलं नाव मागे घेतलं आहे. हे खेळाडू आपापल्या संघासाठी विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी करणार आहेत.

या दिग्गजांवर नजर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फॉर्मात नसलेल्या अनेक दिग्गज खेळाडूंना खरेदीदारही मिळत नाहीत. याचं उदाहरण गेल्या वर्षी ख्रिस गेल, गौतम गंभीर यांच्या रुपाने पाहायला मिळालं होतं. या खेळाडूंना बेस प्राईसमध्येच खरेदी करण्यात आलं. आता यावर्षी युवराज सिंह, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, ब्रँडम मॅक्युलम, शॉन मार्श, रिद्धीमान साहा, अक्षर पटेल आणि मोहम्मद शमी यांचं काय होतं याकडे लक्ष लागलं आहे.

Published On - 9:54 pm, Mon, 17 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI