चमत्कार घडू शकतो, सेमीफायनलसाठी सरफराज अजूनही आशावादी

क्रिकेट विश्वचषकात सुरुवातीला सलग पराभवांना सामोरे जावे लागलेल्या पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एका चमत्काराची गरज आहे. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार आणि यष्टीरक्षक सरफराज अहमद अशाही वेळी आशावादी आहे.

चमत्कार घडू शकतो, सेमीफायनलसाठी सरफराज अजूनही आशावादी

लंडन : क्रिकेट विश्वचषकात सुरुवातीला सलग पराभवांना सामोरे जावे लागलेल्या पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी एका चमत्काराची गरज आहे. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार आणि यष्टीरक्षक सरफराज अहमद अशाही वेळी आशावादी आहे. सरफराज म्हणाला, “शुक्रवारी लॉर्ड्सवर होत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानी संघ पूर्ण तयार आहे.”

पाकिस्तानला सेमीफायनलसाठी पात्र होण्यासाठी अनेक अडथळ्यांना पार करावे लागणार आहे. त्यात अगदी नाणेफेकीपासून सुरुवात आहे. पाकिस्तानला अंतिम 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडावी लागणार आहे. तसेच बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. यात मोठी आकडेवारी आणि गणिती प्रक्रिया देखील आहे. पाकिस्तानने 350 धावा केल्यास त्यांना बांगलादेशला 311 धावांनी, 400 धावा केल्यास 316 धावांनी आणि 450 धावा केल्यास 321 धावांनी पराभूत करावे लागेल.

दुसरीकडे जर बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, तर मैदानावर पहिला चेंडू पडण्याआधीच पाकिस्तानच्या आशा मावळतील. आम्ही येथे सर्व सामने जिंकण्यासाठी आलो आहे, असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार सरफराजने व्यक्त केला. विशेष म्हणजे पाकिस्तानचा संघ बांगलादेशसोबतच्या मागील 4 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने हरलेला आहे.

सरफराज म्हणाला, “आम्ही हा सामना जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करु. आम्हाला थोडं वास्तववादी देखील व्हावं लागेल. मात्र, अल्लाने मदत केली तर नक्कीच चमत्कार घडेल.” यावेळी त्याने विश्वचषकातील खेळपट्ट्यांवर मोठी धावसंख्या उभारणे कठीण असल्याचेही मान्य केले. तसेच जर वास्तववादी होऊन विचार करायचा ठरला तर धावसंख्या 280-300 पर्यंत जाईल असेही त्याने नमूद केले.

दरम्यान, पाकिस्तानची या विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या  इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 348 इतकी राहिली आहे. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर आश्चर्यकारकपणे विजय मिळवला होता. इंग्लंडने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली 397 धावसंख्या ही विश्वचषकातील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.

इंग्लंडने न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानसाठी सेमीफायनलसाठी पात्र होणे जवळजवळ अशक्य केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारतासह इंग्लंड आणि न्युझीलंड हेच संघ सेमीफायनलसाठी निश्चित मानले जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *