जन्म मुंबईत, खेळतो न्यूझीलंडकडून, पण पाकिस्तानला घाम फोडतो!

अबुधाबी : मुंबईत जन्मलेल्या 30 वर्षीय एजाज पटेलने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयात मोठी भूमिका निभावली. अबुधाबीमध्ये खेळवण्यात आलेल्या या रोमांचक सामन्यात पहिल्या कसोटीच्या चौथी दिवशी पाकिस्तानच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आणि न्यूझीलंडने चार धावांनी विजय मिळवला. एजाज पटेल या विजयाचा खरा हिरो ठरला, ज्याने दुसऱ्या डावात पाच विकेट घेत सामन्यात एकूण सात विकेट …

जन्म मुंबईत, खेळतो न्यूझीलंडकडून, पण पाकिस्तानला घाम फोडतो!

अबुधाबी : मुंबईत जन्मलेल्या 30 वर्षीय एजाज पटेलने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयात मोठी भूमिका निभावली. अबुधाबीमध्ये खेळवण्यात आलेल्या या रोमांचक सामन्यात पहिल्या कसोटीच्या चौथी दिवशी पाकिस्तानच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आणि न्यूझीलंडने चार धावांनी विजय मिळवला. एजाज पटेल या विजयाचा खरा हिरो ठरला, ज्याने दुसऱ्या डावात पाच विकेट घेत सामन्यात एकूण सात विकेट नावावर केल्या.

पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानसमोर विजयासाठी 139 धावांचं आव्हान होतं आणि हातात दहा विकेट होत्या. मात्र या फिरकीपटू गोलंदाजाने सर्व बाजूच पालटली आणि न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. पाकिस्तानच्या फलंदाजांना एजाज पटेलने अक्षरशः धडकी भरवली होती. कारण, दुसऱ्या डावात निम्मा संघ एकट्यानेच माघारी धाडला.

कसोटीच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानची सलामीवीर दोडी 37 धावांवरुन पुढे खेळण्यासाठी उतरली होती. हातात दहा विकेट असताना विजयासाठी 176 धावा आवश्यक होत्या. मात्र सुरुवातीलाच इमाम उल हक, मोहम्मद हाफीज आणि हारिस सोहेल यांच्या रुपाने पाकिस्तानला तीन झटके बसले. पाकिस्तानची तीन बाद 48 अशी परिस्थिती झाली. पण यानंतर अजहर अली आणि असद शफीक यांच्या भागीदारीने पाकिस्तानचा विजय जवळ दिसू लागला होता.

पाकिस्तानला या दोन्ही फलंदाजांनी 130 धावांपर्यंत मजल मारुन दिली होती. भागीदारी ही 82 धावांची झाली आणि सामन्यात केवळ औपचारिकताच उरलीय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण न्यूझीलंडने खरा हिरा मागे ठेवला होता. 130 धावांवर नील वॅगनरने असद शफीकला माघारी धाडलं आणि न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. यानंतर अजहर अलीची साथ देत असलेला बाबर आझम 13 धावांवर बाद झाला. पाच बाद 145 अशी परिस्थिती झालेली असताना विजयासाठी केवळ 29 धावांची आवश्यकता होती.

पाकिस्तानला पहिला झटका देणाऱ्या एजाज पटेलचा मोठा धमाका अजून बाकी होता. पाच विकेट असताना फलंदाजीसाठी उतरलेला कर्णधार सरफराज अहमदला तर केवळ तीन धावांवर माघारी धाडण्यात आलं. यानंतर 155 धावांवर असताना वॅगनरने यासिर शाहला शून्यावर बाद केलं. आता पाकिस्तानने सात विकेट गमावलेल्या होत्या आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज होती.

एजाज पटेलची फिरकी समजण्यात पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि याचाच फायदा घेत एजाजने हसन अलीला खातंही उघडू दिलं नाही. 164 धावसंख्येवर पाकिस्तानचा नववा फलंदाज माघारी धाडला गेला. न्यूझीलंडला आता विजयासाठी एकाच विकेटची गरज होती. एजाजने ऐतिहासिक चेंडू टाकत आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची शेवटची विकेट घेतली आणि त्याच्या संघाला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले, ते म्हणजे भारतीय वंशाचे एजाज पटेल आणि ईश सोधी. एजाजने त्याच्या पहिल्याच कसोटीत सात विकेट घेऊन इतिहास रचला. ईश सोधीने या सामन्याच्या पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात दोन विकेट घेऊन महत्त्वाचं योगदान दिलं.

न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 153 धावा केल्या. तर पाकिस्तानचा पहिला डाव 227 धावांवर आटोपला होता. पाकिस्तानला पहिल्या डावातच 74 धावांची आघाडी मिळाली होती.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव 249 धावांवर आटोपला आणि पाकिस्तानसमोर त्यांनी 176 धावांचं लक्ष्य ठेवलं. पाकिस्तानला या सामन्यात सहज विजय मिळेल असं दिसत असताना एजाज खानने कमाल करुन दाखवली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने पाकिस्तानचा पराभव केल्याने भारतीय चाहत्यांनीही त्याच्यासाठी सेलिब्रेशन केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *