Shivraj Rakshe : ..तर त्यांच्यावरही आक्षेप घ्यायला हवा, शिवराजची निलंबनानंतर पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Kesari Shivraj Rakshe Controversy with Umpire : डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याने पंचाचा निर्णय न पटल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर शिवराजने पंचाची कॉलर धरली आणि लाथही मारली. त्यानंतर शिवराजवर 3 वर्षांची कारवाई करण्यात आली.

अहिल्यानगरमध्ये रविवारी 2 फेब्रुवारीला मानाची आणि प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मानाची गदा कुणी पटकावली यापेक्षा या स्पर्धेत झालेल्या गोंधळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. स्पर्धेत 2 पैलवानांना पंचांसोबत वाद घालणं चांगलंच महागात पडलं. पंचांसोबत भिडल्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांवर कुस्ती परिषदेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. दोघांना तब्बल 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. याबाबतची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली. दोन्ही पैलवानांवर करण्यात आलेल्या या कारवाईवरुन राज्यभर क्रीडा वर्तुळात अनेक चर्चा पाहायला मिळत आहे.
कोणत्याही क्रीडा प्रकारात पंचाचा निर्णय हा अंतिम असतो. मात्र कधी कधी पंचांकडूनही चूक होऊ शकते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचाचा एक निर्णय शिवराजला काही पटला नाही. शिवराजने त्यावरुन पंचांसोबत वाद घातला. शिवराज इतक्यावरच थांबला नाही. शिवराजने पंचाची कॉलर धरली आणि लाथही मारली. हा सर्व प्रकार उंपात्य फेरीतील सामन्यात घडला. त्यामुळे शिवराजवर ही निलंबनात्मक कारवाई करण्यात आली. शिवराजने या निलंबनावरुन टीव्ही9 मराठीसह बातचीत केली आणि या सर्व प्रकरणावर आपलं मत मांडलं.
शिवराज काय म्हणाला?
“हे सर्व चुकीचंच झालंय. हे सर्वांनी पाहिलंय. ज्यावेळेला कुस्ती झाली तेव्हा आम्ही पंचांकडे व्हीडिओ पाहून निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तुम्ही त्याआधी असा निर्णय घेऊ शकत नाही. तसा अधिकार नाही. आम्ही तिथे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयोजकांकडे व्हीडिओ दाखवा आणि त्यानुसार निर्णय घ्या, अशी मागणी केली. जर दोन्ही खांदे टेकले असतील, तर हार मानायला तयार आहे, कुस्तीत हार जीत होत असतेच, त्याबद्दल शंका नाही. पण पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडूवर अन्याय होत असेल तर त्यांच्यावरही (पंच) आक्षेप घ्यायला हवा”, अशी प्रतिक्रिया शिवराजने निलंबनाच्या कारवाईवर आणि एकूण प्रकरणावर दिली.
“तेव्हाच का नाही स्पष्ट केलं?”
“त्यांच्या बाजूनेही मीडियाद्वारे हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगितलं. मग त्या वेळेसच व्हीडिओ दाखवून पंचाचा निर्णय चूक आहे की बरोबर? हे स्पष्ट का नाही केलं”, असा प्रश्नही शिवराजने उपस्थित केला.
