Asia Cup 2025 : जपान विरुद्धचा सामना बरोबरीत, टीम इंडिया त्यानंतरही फायनलमध्ये, अंतिम फेरीत कुणाचं आव्हान?
Womens Hockey Asia Cup Gongshu 2025 : टीम इंडियाने या स्पर्धेत 3 पैकी 1 सामना जिंकलाय. टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडियासमोर अंतिम फेरीत चीनंचं आव्हान असणार आहे. अंतिम सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे.

मेन्स हॉकी टीम इंडियाने काही दिवसांपूर्वी कोरियावर मात करत आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारतीय संघाने तब्बल 8 वर्षांनंतर आशिया कप उंचावला. मेन्सनंतर आता वूमन्स हॉकी टीम इंडियाही आशिया कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. वूमन्स टीम आशिया चॅम्पियन होण्यापासून एक पाऊल दूर आहे. वूमन्स टीमने हॉकी आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात धडक दिली आहे. इंडिया विरुद्ध जपान यांच्यात हांगझोऊमध्ये सुपर 4 मधील सामना खेळवण्यात आला. हा सामना 1-1 ने बरोबरीत राहिला. मात्र त्यानंतरही भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
टीम इंडियासाठी ब्युटी डुंगडुंग हीने सामन्यातील सातव्या मिनिटाला पहिलावहिला गोल केला. भारताने यासह 1-0 ने आघाडी घेतली. भारताने अखेरपर्यंत ही आघाडी कायम ठेवली. मात्र शेवटच्या क्षणी जपानने गोल करत बरोबरी केली. जपानसाठी शिहो कोबायाकावा हीने 58 व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने फायनलमध्ये धडक दिली. भारतासमोर अंतिम फेरीच चीनचं आव्हान असणार आहे.
महिला ब्रिगेडने सामन्याची सुरुवात आक्रमकपणे केली. भारताच्या आक्रमक खेळामुळे जपानची डोकेदुखी वाढवली. इशिका चौधरी हीने गोलपोस्टवर निशाणा लावत फटका मारला. मात्र थोडक्यासाठी अंदाज चुकला. इशिकाने मारलेला फटका फ्रेमवर जाऊन आदळला. त्यानंतर जपाननेही पलटवार केला. मात्र ब्युटीने केलेल्या गोलमुळे भारताने आघाडी घेतली. भारताला पहिल्या क्वार्टरमध्ये अखेरच्या क्षणी पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. मात्र भारताला आघाडी आणखी मजबूत करता आली नाही.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये काय झालं?
टीम इंडिया आघाडीवर असल्याने जपानवर बरोबरी करण्याचं दडपण होतं. जपानने बरोबरी करण्यासाठी आक्रमकपणे खेळायला सुरुवात केली. जपानला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. मात्र भारतीय डिफेन्ससमोर जपानला खातं उघडता आलं नाही.
भारताने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. मात्र क्वार्टरच्या शेवटी शेवटी जपानने भारतावर कुरघोडी करत दबाव तयार केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. भारताने हाफ टाईमपर्यंत आपली आघाडी यशस्वीरित्या कायम राखली.
वूमन्स टीम इंडियाने तिसऱ्या सत्रात जपानवर कुरघोडीचा प्रयत्न केला. भारताने जपानची डोकेदुखी वाढवली. मात्र भारताला दुसरा गोल करता आला नाही. मात्र तिसऱ्या सत्रातही भारताने आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवलं.
चौथ्या क्वार्टरमध्ये काय झालं?
चौथ्या आणि शेवटच्या सत्रात जपानवर पूर्ण दबाव होता. भारताला जिंकण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही स्थितीत जपानला गोल करणं भाग होतं. त्यामुळे जपानने पूर्ण जोर लावला. पाहता पाहता सामना संपत आला. शेवटच्या काही सेकंदाचा खेळ बाकी राहिला. त्यामुळे भारताचा विजय निश्चित झाल्यात जमा होता. मात्र जपानला अखेर 58 व्या मिनिटाला गोल करण्यात यश आलं. शिहो कोबायाकावाने हीने गोल केला. त्यामुळे जपानला यश 1-1 ने बरोबरीत करण्यात यश आलं. त्यानंतर सामना संपल्याची घोषणा करण्यात आली. अशाप्रकारे सामना बरोबरीत राहिला.
