इम्रान खानचा सल्ला नाकारणाऱ्या सरफराजला नेटकऱ्यांनी धुतलं

मँचेस्टर येथे रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा सल्ला दिला. मात्र, सरफराजने याकडे दुर्लक्ष करत सरळ याच्या उलट निर्णय घेतला.

इम्रान खानचा सल्ला नाकारणाऱ्या सरफराजला नेटकऱ्यांनी धुतलं

लंडन: भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदवर टीका होत आहे. माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी सरफराज अहमदला नाणेफक जिंकल्यास प्रथम फलंदाजी घेण्याचा सल्ला दिला. मात्र, सरफराजने याकडे दुर्लक्ष करत अगदी याच्या उलट गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने रोहित शर्माच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर 337 धावांचे आव्हान उभे केल्यानंतर सरफराजचा हा निर्णय चुकीचा ठरला. यानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून सोशल मीडियावर सरफराजला चांगलेच ट्रोल करण्यात आले.

इम्रान खान यांच्या नेतृत्वातच पाकिस्तानने 1992 च्या क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. तो पाकिस्तानने जिंकलेला आतापर्यंतचा एकमेव विश्वचषक आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानी संघाला बेधडक आणि आक्रमक खेळायला सांगितले. बचावात्मक खेळल्यास अधिक चुका होतात, असेही नमूद केले. तसेच नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करण्याचाही सल्ला दिला होता.

योगायोगाने पाकिस्तानने नाणेफेकही जिंकली मात्र कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकत फलंदाजी ऐवजी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सरफराजला वेगवान गोलंदाजांचा चेंडू स्विंग होईल, असा अंदाज होता. मात्र, त्याचा हा अंदाज फोल ठरला आणि गोलंदाजीचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच महाग पडला. भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात करताच ट्विटर युजर्सने सरफराजला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 336 धावांचा डोंगर उभा केला. यात सलामीवीर रोहित शर्माच्या दमदार 140 धावांचा मोठा वाटा राहिला. या 337 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाच्या मात्र नाकीनऊ आले. दोनदा पावसाच्या व्यत्ययामुळे सामना काहीवेळ थांबवावा लागला होता. अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य देण्यात आले. मात्र, पाकिस्तानी संघ केवळ 6 बाद 212 इतक्या धावा करु शकला. त्यामुळे भारताने हा सामना 89 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अजय राहण्याची आपली परंपरा कायम ठेवली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *