‘WORLD CUP टीममध्ये दुखापतग्रस्त केदार जाधव ऐवजी ऋषभ पंतला संधी द्यावी’

‘WORLD CUP टीममध्ये दुखापतग्रस्त केदार जाधव ऐवजी ऋषभ पंतला संधी द्यावी’


नवी दिल्ली : IPL 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या केदार जाधवच्या तंदुरुस्तीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तो भारतीय वर्ल्ड कप टीमचाही सदस्य आहे.  अशास्थितीत त्याचे विश्वचषकासाठी संघात पुनरागमन होणार की नाही याबद्दल शंका व्यक्त होत आहे. यावर माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांनी केदार जाधव तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्या जागेवर ऋषभ पंतला संधी देण्याची मागणी केली आहे.

केदार जाधवने IPL च्या या हंगामात 14 सामने खेळले. मात्र, दुखापतग्रस्त झाल्याने त्याला प्लेऑफचा एकही सामना खेळता आला नाही. केदार जाधव लवकरच तंदुरुस्त होईल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र, सध्या त्याच्यातील सुधारणांचा वेग पाहता त्याला पुनरागमन करायला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.

भारतीय संघ प्रशासनासमोरचा मोठा पेच

भारतीय संघाचे फिजियो पॅट्रिक फरहत ऑस्ट्रेलियातून भारतात परतले आहे. त्यांनी मुंबईत कॅम्पही सुरु केला आहे. त्यामुळे आता केदार जाधव वेळेवर तंदुरुस्त होणार की नाही यावर अनेकांचे लक्ष लागून आहे. पहिल्या सामन्याआधी जाधव तंदुरुस्त झाला नाही, तरी तो दुसऱ्या सामन्यापर्यंत फिट होईल, असाही अंदाज लावला जात आहे. त्यामुळे यावर काय निर्णय घ्यायचा? हा भारतीय संघ प्रशासनासमोरचा मोठा पेच आहे.

‘वर्ल्ड कप अगोदर भारतीय संघाने कमीत कमी सामने खेळायला हवेत’

माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांच्यानुसार भारतीय संघातील खेळाडूंसमोर तंदुरुस्त राहणे हेच मोठे आव्हान असणार आहे. ते म्हणाले, “वर्ल्ड कप अगोदर भारतीय संघाने कमीत कमी सामने खेळायला हवेत. भारताच्या संघाचे लक्ष्य तंदुरुस्त असण्यावर असावे. कसोटी सामन्यांआधी सराव सामन्यांची आवश्यकता असते. मात्र, एकदिवसीय सामन्यासाठी तशी आवश्यकता नसते.”

‘पंत 10 षटकांमध्ये सामन्याची दिशा बदलू शकतो’

ऋषभ पंतला दुखापतग्रस्त केदार जाधवच्या जागेवर संधी देण्याबाबत ते म्हणाले, “भारतीय संघाला यशासाठी तंदुरुस्ती महत्वाची आहे. केदार जाधवच्या तंदुरुस्तीबाबत संशय आहे. जर तो फिट झाला नाही, तर मला त्याच्या जागेवर ऋषभ पंतला संघात पाहायला आवडेल. तो एक असा खेळाडू आहे जो विरोधी संघातील गोलंदाजांवर वरचढ ठरु शकतो आणि सामना जिंकण्यास मदत करु शकतो. पंत 10 षटकांमध्ये अथवा अर्ध्या तासात सामन्याची दिशा बदलू शकतो. विश्वचषकात विजय मिळवण्यासाठी अशा खेळाडूंची गरज असते. तो कधी कधी चुकीचे शॉट्स खेळतो, मात्र एक खेळाडू संघात अधिकाधिक सामने खेळतच शिकत असतो. तो ‘लम्बी रेसचा घोडा’ आहे.”

सध्या 3 खेळाडूंना राखीव म्हणून ठेवले आहे. त्यात गोलंदाज नवदीप सैनी, यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि अंबाती रायडूचा समावेश आहे. कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास यापैकी एकाला संधी मिळेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI