सचिन तेंडुलकरच्या संघात धोनीला स्थान नाही, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद

सचिनने निवडलेल्या संघात पाच भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. पण सध्याच्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. 

सचिन तेंडुलकरच्या संघात धोनीला स्थान नाही, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्कचषक 2019 संपल्यानंतर सर्वश्रेष्ठ 11 खेळाडूंची निवड केली आहे. ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. या टीमचा कर्णधार म्हणून त्याने न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनकडे जबाबदारी दिली आहे. सचिनने निवडलेल्या संघात पाच भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. पण सध्याच्या भारतीय संघातील सर्वात अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

सचिन तेंडुलकरने निवडलेल्या टीममध्ये पाच भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमरा यांची सचिनने विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली आहे. पण यामध्ये धोनीचा समावेश नाही. धोनीच्या चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

सचिनने निवडलेल्या संघात रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो हे सलामीवीर आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार केन विल्यम्सन आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आहे आणि त्यानंतर बांगलादेशचा शाकिब-अल-हसन, इंग्लंडचा बेन स्टोक्स, पंड्या आणि जाडेजाचा नंबर आहे.

सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमरा यांना तीन प्रमुख गोलंदाज म्हणून निवडलं आहे. याआधी आयसीसीनेही विश्वचषकानंतर आपल्या 11 खेळाडूंची निवड केली होती. ज्यामध्ये भारतातील रोहित आणि बुमराला संधी देण्यात आली.

सचिन तेंडुलकरने निवडलेला संघ

रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यम्सन (कर्णधार), विराट कोहली, शाकिब अल-हसन-, हार्दिक पंड्या, बेन स्टोक्स, रवींद्र जाडेजा, मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमरा

आयसीसीच्या संघात विराटला स्थान नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने विश्वचषकानंतर आपला 11 खेळाडूंचा संघ जाहीर केलाय, ज्यात बाराव्या खेळाडूचाही समावेश आहे. यामध्ये आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीलाही स्थान मिळालेलं नाही. विश्वचषकात खेळलेल्या भारतीय संघापैकी सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना स्थान देण्यात आलंय. तर बारावा खेळाडू म्हणून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचं नाव आहे. इंग्लंडच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

रोहित शर्माने या विश्वचषकात 9 सामन्यांमध्ये 98.33 च्या सरासरीने 648 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 5 शतकांचाही समावेश आहे. यामध्ये तीन शतकं त्याने सलग ठोकली आहेत. आयसीसीने रोहित शर्माला सलामीवीर फलंदाज म्हणून स्थान दिलंय, पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचाही संघात समावेश नाही.

संपूर्ण संघ

रोहित शर्मा, जेसन रॉय, केन विल्यम्सन, शाकिब अल हसन, ज्यो रुट, बेन स्टोक्स, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, लॉकी फर्ग्युसन, जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट (बारावा खेळाडू)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *