She Paddle 2025 : भारतातील ‘या’ शहरात रंगणार पहिली आंतरराष्ट्रीय मास्टर्स महिला टेबल टेनिस स्पर्धा, दिग्गज खेळाडू करणार नेतृत्व
गोव्यात 5 ते 7 सप्टेंबरला आयोजित होणाऱ्या 'शी पॅडल' आंतरराष्ट्रीय मास्टर्स महिला टेबल टेनिस स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू सहभागी होतील. १.२५ लाख रुपयांच्या बक्षीस रकमेसह ही स्पर्धा भारतातील पहिलीच मास्टर्स महिलांसाठी समर्पित आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल. स्पर्धेच्या समापन सोहळ्यात 'स्मॅश हर स्टोरी' नावाच्या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे, ज्यात भारतीय महिला टेबल टेनिस चॅम्पियन्सच्या कथा असतील. २०२६ मध्ये ही स्पर्धा रोमानियात होणार आहे.

येत्या 5 ते 7 सप्टेंबरदरम्यान गोव्यात शी पॅडल इंटरनॅशनल मास्टर्स महिला टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आह. टेबल टेनिसच्या दुनियेतील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत दिसणार आहेत. सर्वात प्रतिष्ठित खेळाडू ज्यात 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील जागतिक विजेता मंतु मुर्मुर, माजी राष्ट्रीय विजेती, मास्टर्स राष्ट्रीय विजेती आणि राष्ट्रकुल पदक विजेती रीता जैन आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेती आणि 8 वेळा मास्टर्स नॅशनल चॅम्पियन मंगल सराफ यांच्यासह अनेक जणी सहभागी होऊन स्पर्धेची शोभा वाढवणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमात बुखारेस्ट, रोमानिया येथील एक आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील सहभागी होईल.
भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित केली जात असून ती केवळ मास्टर्स महिलांसाठी समर्पित आंतरराष्ट्रीय बक्षीस स्पर्धा असेल, ज्यामध्ये भारत आणि परदेशातील 50 ते 100 खेळाडू सहभागी होतील. 1.25 लाख रुपयांची बक्षीसाची रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला देण्यात येईल. या पहिल्या आवृत्तीत 40+, 50+ आणि 60+ वयोगटातील महिला एकेरी आणि दुहेरी स्पर्धांसह एक प्रतिष्ठित सांघिक अजिंक्यपद स्पर्धा असेल.
मास्टर्स श्रेणीमध्ये खेळ सुरू ठेवून नवीन पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या महिलांची ताकद, आवड आणि अमर प्रेमाला आदरांजली वाहणारा वार्षिक प्रमुख कार्यक्रम म्हणून ‘शी पॅडलची’ रचना करण्यात आली आहे. तर 2026 ची या स्पर्धेची आवृत्ती रोमानियातील बुखारेस्ट येथे आयोजित केली जाईल, ज्यामुळे ही स्पर्धा महिला क्रीडा क्षेत्राचा खऱ्या अर्थाने जागतिक उत्सव बनेल, असेही आयोजकांनी घोषित केलं.
“स्मॅश हर स्टोरी” या ऐतिहासिक पुस्तकाचं ग्रँड फिनालेमध्ये होणार प्रकाशन
5 ते 7 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असून 7 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा भव्य समापन सोहळा पार पडेल. त्याचदरम्यान 1947 ते 2024 पर्यंतच्या 32 भारतीय राष्ट्रीय महिला चॅम्पियन्सना समर्पित “स्मॅश हर स्टोरी” नावाच्या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन देखील होणार आहे. हे पुस्तक शमिक चक्रवर्ती आणि दिलीप प्रेमचंद्रन यांनी लिहीलं असून क्रीडा इतिहासकार बोरिया मजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलं आहे. आयटीटीएफ अध्यक्षा आणि आयओसी सदस्य पेट्रा सोर्लिंग यांच्या पाठिंब्याने तयार झालेले हे पुस्तक केवळ खेळाडूंच्या कामगिरीची यादी नाही तर त्यांच्या संघर्षाची, सीमा ओलांडण्याची आणि भावी पिढ्यांसाठी आदर्श निर्माण करण्याची कहाणी सांगणारा एक प्रेरणादायी दस्तऐवज आहे.
प्रेस कॉन्फरन्समध्ये दिग्गजांची हजेरी
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. त्यावेळी उपस्थित असलेले दिग्गज:
मूनमून मुखर्जी – माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू, केअर फाउंडेशनच्या अध्यक्षा, पी३ स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या संस्थापक, चॅम्पियन चार्म्सच्या सह-संस्थापक आणि “स्मॅश हर स्टोरी” च्या निर्मात्या.
दीपा जैन – ज्येष्ठ राष्ट्रीय विजेती, ज्वेलरी डिझायनर, NISH Jewels च्या संस्थापक आणि चॅम्पियन चार्म्सच्या सह-संस्थापक.
शिल्पा जोशी टाकळकर – माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेती, अनेक वेळा राष्ट्रीय विजेती, चॅम्पियन चार्म्सची सह-संस्थापक आणि “स्मॅश हर स्टोरी” ची सह-निर्माती.
दीपक गोपाणी – संस्थापक सचिव, राज्य अनुभवी विजेता आणि गोवा अनुभवी टेबल टेनिस असोसिएशनचे प्रवर्तक.
विशेष अतिथी आणि समर्थक :
या कार्यक्रमात अनेक खास पाहुणे देखील उपस्थित होते.
कमलेश मेहता – ८ वेळा राष्ट्रीय विजेता, अर्जुन पुरस्कार विजेता आणि टीटीएफआयच्या सरचिटणीस
पूजा बेदी – प्रसिद्ध अभिनेत्री आणि वेलनेस कोच
डॉ. गीता नागवेणकर – कार्यकारी संचालक, भारतीय क्रीडा प्राधिकरण
नीरज बजाज – अध्यक्ष, बजाज ग्रुप आणि कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक
गोवा टेबल टेनिस असोसिएशनचे वरिष्ठ अधिकारी – श्री सुदिन वरेकर (अध्यक्ष) आणि श्री मयूर सावकर (उपाध्यक्ष)
तसेच गोवा सरकारचे इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शी पॅडल : टूर्नामेंट नव्हे एक आंदोलन
“ही केवळ एक स्पर्धा नव्हे तर एक चळवळ, एक आंदोलन” असे याचे वर्णन मुनमुन मुखर्जी यांनी केलं. ही अशी चळवळ आहे की , हा असा उत्सव आहे जो एक अशी चळवळ जी खेळाबद्दलची त्यांची आवड जोपासत प्रेरणादायी वारसा निर्माण करणाऱ्या महिलांचं काम साजरं करते, असं त्या म्हणाल्या. हा कार्यक्रम क्रीडा, संस्कृती आणि सक्षमीकरणाचा संगम आहे, गोव्याला मास्टर्स क्रीडा क्षेत्राचे जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असा पुनरुच्चार आयोजन समितीने केला.
शी पॅडल 2025 मध्ये जागतिक दर्जाच्या स्पर्धा, प्रेरणादायी कथा आणि खेळाच्या आत्म्याला नवीन अर्थ देणाऱ्या महिलांचा उत्सव साजरा केला जाईल.
