Shubman Gill : ‘त्या’ मेसेजमुळे दुबईत शुबमनने केली अविस्मरणीय खेळी, कोणी पाठवला निरोप ?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. त्याने बांगलादेशविरुद्ध 101 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामुळे टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. त्याच्या या शानदार खेळीमागील रहस्य म्हणजे एक मेसेज आहे. ड्रेसिंग रूममधून आलेला तो मेसेज काय होता ?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवत स्पर्धेची चांगली सुरुवात केली. दुबईत झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव केला. या महत्त्वाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला शुभमन गिल. त्याच्या 101 धावांच्या नाबाद खेळीमुळेच या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला धूळ चारली. स्कोअरबोर्ड पाहता हा विजय सोपा वाटत असला तरी एक वेळ अशी आली होती की टीम इंडिया दडपणाखाली होती. सामना बराच रखडला होता आणि उलटफेर होण्याची चिन्हे दिसू लागली होती. मात्र तेवढ्यात गिलला ड्रेसिंग रूममधून एक मेसेज आला आणि मग तो बांगलादेशच्या गोलंदाजासमोर एखाद्या खडकासारखा अभेद्य उभा राहिला आणि त्याने उत्तम खेळी केली. शुबमनने फक्त नाबाद शतक ठोकलं नाही तर भारताचा खेल संपेपर्यंत तो खेळपट्टीवर टिकून उभा होता आणि टीम इंडियाची नाव पार केली. मात्र शुबमनला आलेला तो मेसेज नेमका होता तरी काय ?
गिलची नाबाद शतकी खेळी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये दुबईत खेळताना प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने अवघ्या 35 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. पण नंतर त्यांनी खेळ सावरला आणि भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले. त्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या 10 षटकांत 69 धावा केल्या. त्यामुळे हे लक्ष्य साध्य करणं खूप सोपं वाटत होतं. मात्र भारतीय कर्णधार आऊट होताच सामना हळूहळू अडकू लागला. संथ विकेटमुळे धावा काढणे कठीण झाले.
एवढेच नव्हे तर दुसरीकडे भारतीय संघाच्या विकेट्स ठराविक अंतराने पडत होत्या. संघाच्या 144 धावा होईपर्यंत रोहित, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यामुळे टीम इंडिया दडपणाखाली आली. मात्र, गिल अजूनही क्रीजवरच टिकून होता.
भारताला आणखी 95 धावा करायच्या होत्या, त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित यांनी गिलला मैदानावर पाठवला. शेवटपर्यंत टिकून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल, असा मेसेज त्याला देण्यात आला. कोच आणि कर्णधाराची ही आज्ञा गिलने पाळली आणि संयम दाखवत तो मैदानावर टिकून राहिला. त्यानंतर त्याने 101 धावांची खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. याचा खुलासा खुद्द गिलने सामन्यानंतर केला.
शतकाबद्दल काय म्हणाला शुबमन गिल ?
त्याच्या शतकी खेळीसाठी शुबमन गिलला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना त्याने आपल्या शतकाबद्दल प्रतिक्रिया दिली. ही माझी आतापर्यंतची सर्वात समाधानकारक खेळी आहे. या सामन्यात मी ज्या प्रकारे कामगिरी केली त्यामुळे खुप खुश असल्याचे शुबमनने नमूद केलं.
