T20 World Cup : बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आता यू-टर्न ? ICC कडे केली मोठी मागणी
टी-20 वर्ल्डकपसाठी आपला संघ भारतात पाठवणार नाहीत अशी घोषणा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नुकतीच केली होती. हे सामने स्थलांतरित करा अशी मागणीही त्यांनी आयसीसीला केली होती. तेव्हापासून आयसीसीकडून त्यांची लमजूतक घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टी20 वर्ल्डकप (T20 world Cup) अद्याप सुरूह झाला नाही पण त्याआधीच भारत (India)आणि बांगलादेशमधील (Bangladesh) संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून भारतात सामने खेळण्यासाठी बांगलादेशी टीमला पाठवण्यास नकार दिला होता. यामुळे मोठी खळबळ माजली होती. तसेच त्यांनी भारतातील सामने इतरत्र हलवण्याचीही मागणी केली होती. मात्र आता घडलेल्या काही गोष्टीमुळे वेगळीच परिस्थिती दिसत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा राग शांत झाला आहे का? की त्यांच्या हट्टी भूमिकेमुळे जे नुकसान होू शकतं त्याची त्यांना जाणीव झाली आहे? की बांगलादेश बोर्डाला त्यांची चूक कळली आहे? असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतात होणाऱ्या टी-20 वर्लडकपमध्ये आपला संघ न पाठवण्याचा निर्णय घेऊन बीसीबीने आधीच वाद निर्माण केला आहे. त्यामुळे हे प्रकरण थेट ICC कडे पोहोचलं असून त्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.याच पार्श्वभूमीवर बांगलादेश क्रिकेट बोर्ड आता त्यांचा निर्णय मागे घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे.
बांगलादेशने आयसीसीकडे का मागितला वेळ ?
एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की ICCशी चर्चा केल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) वेळ मागितला असून यासंदर्भात त्यांच्या सरकारशी सल्लामसलत करणार असल्याचे सांगितलं आहे. इंग्रजी वृत्तपत्र द टेलिग्राफच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आयसीसीने बीसीबीला काही आश्वासनं दिली आहेत. बांगलादेशची टीम भारतात सामने खेळण्यास तयार असेल तर त्यांना भारतात कडक सुरक्षा देण्यात येईल तसेच त्यांच्या वेळापत्रकात काही बदल केले जातील असंही आयसीसीने सांगितल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, आयसीसीकडून याबद्दलचे अधिकृत पत्र अद्याप बीसीबीला पाठवण्यात आलेलं नाही.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या निर्णयाबाबत आयसीसीकडे काही वेळ मागितला आहे असा या अहवालात दावा करण्यात आला आहे. या विषयावर बांगलादेश सरकारशी सल्लामसलत करू आणि त्यानंतरच उत्तर देऊ असंही बीसीबीने सांगितल्याचं समजतं. रविवार, 4 जानेवारी रोजी झालेल्या आपत्कालीन बैठकीत बीसीबीने टी-20 वर्ल्डकपसाठी आपला संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतला होता आणि बांगलादेश सरकारनेही या निर्णयाला मान्यता दिली होती. मात्र आता या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी बीसीबील त्यांच्या सरकारशी पुन्हा चर्चा करावी लागेल.
T20 वर्ल्डकप मधून माघार घेणं पडणार महागात, बांगलादेशचं मोठं नुकसान ?
बीसीबीने टीम भारतात टीम न पाठवण्याची घोषणा केल्यावर सोमवारपासूनच आयसीसीमध्ये या मुद्द्यावर सतत चर्चा सुरू झाली होती आणि या काळात आंतरराष्ट्रीय परिषदेने भारतीय आणि बांगलादेशी बोर्डांच्या अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा देखील केली असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, असं असूनही बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (संघ भारतात न पाठवण्याचा) निर्णय कायम ठेवल्यास आयसीसीकडून इतर पर्यायांचीही चाचपणी करण्यात आली आहेय
बांगलादेशचं होऊ शकतं मोठं नुकसान
ICC तसेच BCCI शी शत्रुत्व पत्करणं हे फारसं चांगलं ठरणार नाही याची बांगलादेश क्रिकेट बोर्डाला कल्पना आहेच. जर बीसीसीआयने पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेश देखील द्विपक्षीय क्रिकेट संबंध संपवले तर BCBचे मोठे नुकसान होईल, कारण भारतीय संघाच्या दौऱ्यातून त्यांना आणि इतर देशांच्या बोर्डांना सर्वाधिक महसूल मिळतो. तसेच भविष्यात, आयपीएल आणि जगभरातील इतर अनेक लीगचे दरवाजे, (जिथे भारतीय व्यावसायिकांनी संघ खरेदी केले आहेत) त्यांच्या खेळाडूंसाठी बंद होऊ शकतात. एवढंच नव्हे तर आयसीसीमध्ये भारताच्या वर्चस्वाचे परिणामही बीसीबीला भोगावे लागू शकतात.
