फक्त स्मिथ अन् वॉर्नर नाही तर सँडपेपर कांडमध्ये… निवृत्तीनंतर उस्मान ख्वाजाचा धक्कादायक खुलासा!
Usman Khawaja On Sandpaper Controversey: ऑस्ट्रेलियन माजी फलंदाज उस्मान ख्वाजाने नुकताच एक मोठा धक्कादायक खुलासा केला आहे.

Usman Khawaja On Sandpaper Controversey: उस्मान ख्वाजाने एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. त्याच्या या खुलाशांमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील एका अत्यंत काळ्या अध्यायाला पुन्हा वाचा फुटली आहे. त्याचा दावा आहे की, २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान झालेल्या बॉल टॅम्परिंगच्या घटनेत संपूर्ण संघ सामील होता आणि याबद्दल सर्वांना माहिती होती. या माजी ऑस्ट्रेलियन फलंदाजाने असाही आरोप केला आहे की, केप टाऊनमध्ये कॅमेरॉन बँक्रॉफ्ट कॅमेऱ्यात कैद होण्यापूर्वी, पोर्ट एलिझाबेथ येथील मागील कसोटीतही चेंडूवर सँडपेपरचा वापर करण्यात आला होता.
सँडपेपरगेट, किंवा बॉल टॅम्परिंग, मार्च २०१८ मध्ये न्यूलँड्स येथील तिसऱ्या कसोटीदरम्यान उघडकीस आले. रिव्हर्स स्विंग मिळवण्यासाठी बँक्रॉफ्ट चेंडू घासण्याकरिता सँडपेपर वापरत असल्याचे टेलिव्हिजन कॅमेऱ्यांमध्ये दिसले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपासात डेव्हिड वॉर्नर हा यामागील सूत्रधार, तर बँक्रॉफ्ट हा गुन्हेगार असल्याचे आणि तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथला या घटनेची माहिती असूनही तो ती थांबवण्यात अपयशी ठरल्याचे निष्पन्न झाले.
या तिन्ही खेळाडूंना दौऱ्यातून घरी पाठवण्यात आले. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली, तर बँक्रॉफ्टला नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. वॉर्नरवर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील नेतृत्वाच्या भूमिकांवर आजीवन बंदी घालण्यात आली होती, जी २०२४ मध्ये रद्द करण्यात आली.
१० नोव्हेंबर रोजी त्याच्या ‘सबर’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वी, ख्वाजाने दावा केला की बॉल टॅम्परिंग सुरुवात पोर्ट एलिझाबेथ येथील दुसऱ्या कसोटी सामन्यापासूनच झाली होती. केप टाऊन कसोटीदरम्यान तो बँक्रॉफ्टच्या शेजारी बसलेला असतानाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या तपास अधिकाऱ्यांनी त्याच्याशी कधीच का संवाद साधला नाही, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. त्या घटनेत प्रत्येकजण सामील होता. केवळ फलंदाज, गोलंदाज किंवा कर्मचारीच नाही, तर आम्ही सर्वच.”
ख्वाजा म्हणाला की, “जबाबदारी केवळ तीन खेळाडूंवर न सोडता संपूर्ण संघाने वाटून घ्यायला हवी होती, असे मला नेहमी वाटत आले आहे. त्या घटनेनंतर त्याने ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सहकाऱ्यांना सामूहिक जबाबदारी घेण्यास सांगितले होते, परंतु गोष्टी तशा घडल्या नाहीत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या चौकशीदरम्यान आपली बाजू का विचारली गेली नाही, असा प्रश्नही ख्वाजा यांनी उपस्थित केला.
