टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. कारण संघाची बांधणी आणि खेळाडूंच्या फिटनेसची चाचपणी यातून करता येणार आहे. असं असताना या तयारीला इंग्लंड वनडे मालिकेत धक्का बसला. वनडे मालिका गमावल्यानंतर कर्णधार गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता रिपोर्टनुसार हार्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदरसाठी नियमांची पायमल्ली केल्याचं बोललं जात आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला अजून एका वर्षाचा अवधी शिल्लक आहे. मात्र त्यासाठी आतापासूनच टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाची बांधणी केली जात आहे. पण या स्पर्धेपूर्वी एका वर्षाच्या कालावधीत खेळाडूंच्या दुखापतीचा मुद्दा अधिक गडद होत आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये खेळाडूंच्या फिटनेसवर व्यवस्थितरित्या काम होत नाही. त्यामुळे खेळाडू वारंवार दुखापतग्रस्त होत आहेत. भारताचे काही खेळाडू इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाले. नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला. त्यामुळे वैतागलेल्या कर्णधार शुबमन गिलने तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. जर असंच सुरू राहिलं तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या संघाच्या स्थान मिळणार नाही, अशा भावना त्याने बोलून दाखवल्या.
भारतीय खेळाडू पूर्णपणे फिट नाहीत!
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या खेळाडूंना हॅमस्ट्रिंगची दुखपात वारंवार होत आहे. त्यामुळे ते पूर्णपणे फिट नाहीत. खेळाडू मैदानात उतरण्यापू्र्वीच पूर्णपणे बरे नव्हते, असं बोललं जात आहे. मात्र असं असूनही त्यांना संधी दिली गेली. बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार असं वाटते की तालमेल बिघडला आहे. टीम इंडिया आणि सेंटर ऑफ एक्सीलेंस यांच्यात संवादाचा अभाव आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू 2023, 2024 आणि 2025 मधील तीन आयसीसी स्पर्धांसाठी फिट अँड फाईने होते. वृत्तानुसार, गेल्या वर्षी संघात झालेल्या बदलानंतर काही वरिष्ठ खेळाडूंना नवीन प्रणालीशी जुळवून घेणे कठीण जात आहे. त्यामुळे हॅमस्ट्रिंगच्या दुखापती वारंवार होत असल्याने चिंता वाढली आहे.रिपोर्टनुसार, नितील पटेल गेल्यापासून त्यांच्या जागी सीईओने मेडिकल स्टाफ हेडची नियुक्तीच केलेली नाही.
वॉशिंग्टन सुंदरबाबत मोठा खुलासा, हर्षितबाबत नाराजी!
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, वॉशिंग्टन सुंदरला टी20 वर्ल्डकप संघात घाईघाईत सहभागी करून घेतलं होतं. बातमीनुसार, ‘संघात सामील झाल्यानंतर सुंदरला सामन्यासाठी तंदुरुस्त होण्यास 10 दिवस लागले. संघ व्यवस्थापनाने स्पर्धेदरम्यानच तयार राहण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला होता.’ रिपोर्टनुसार, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांना वारंवार होणाऱ्या दुखापतीमुळे बीसीसीआयचा संताप झाला आहे. हर्षित राणा अनफिट असताना त्याला संघात संधी कशी दिली, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संघ व्यवस्थापनाच्या दबावामुळे हर्षित राणाला खेळण्याची संधी मिळाली, अशी चर्चा आहे. गुडघ्याच्या दुखापूर्वीचे वजन त्याने पुन्हा मिळवले नव्हते. तरीही त्याला खेळण्याची संधी दिली.
