Abhishek Sharma: अभिषेक शर्मासाठी टीम इंडियाचा नियम वेगळा का? भारतीय क्रिकेटपटूने उपस्थित केला प्रश्न
अभिषेक शर्माची बॅट 2026 या वर्षात शांत आहे. अभिषेक शर्माला धावा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातही फेल गेला. आता त्याच्या संघातील स्थानावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अभिषेक शर्मासाठी 2026 हे वर्ष काही ठरताना दिसत आहे. टी20 संघात त्याचं स्थान कायम असलं तरी त्याची कामगिरी निराशाजनक आहे. इंग्लंड आणि झिम्बाब्वे दौरा त्याच्यासाठी वाईट स्वप्न ठरलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत काही खास करू शकला नाही. इतकंच काय झिम्बाब्वेतही त्याची बॅट काही चालली नाही. त्याची सुमार कामगिरी पाहून हनुमा विहारी याने टीम इंडियावर निशाणा साधला आहे. हनुमा विहारीने थेट प्रश्न केला की, संजू सॅमसनने पाच सामन्यात सुमार कामगिरी केल्यानंतर त्याला संघातून बाहेर काढलं होतं. आता अभिषेक शर्मासोबत असं का केलं जात नाही? येथे प्रत्येक खेळाडूला वेगळा नियम आहे का?
हनुमा विहारीने काय सांगितलं?
हनुमा विहारीने आपल्या युट्यूब चॅनेलवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. हनुमा विहारी म्हणाला की, ‘वर्ल्डकपपू्र्वी संजू सॅमसन पाच सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याला प्लेइंग 11 मधून आपलं स्थान गमवावं लागलं. यानंतर कमबॅक केलं आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला. त्या स्पर्धेत अभिषेक शर्माने किती धावा केल्या?’
हनुमा विहारीने पुढे सांगितलं की, ‘युकेत झालेल्या मालिकेत अभिषेक शर्माने एक अर्धशतक ठोकलं. या व्यतिरिक्त त्याने एकीह मोठी खेळी खेळली नाही. मागच्या आठ सामन्यात एक अर्धशतक आहे. मागच्या 18 सामन्यात तीन अर्धशतक आहे. सॅमसन वर्ल्डकप स्पर्धेत किती सामने खेळला? तर तीन.. तीन सामन्यात त्याने अर्धशतक ठोकलं. अभिषेक शर्माचा मागच्या पाच सामन्याती सर्वोत्तम स्कोअर हा 16 आहे. कोणीही याबाबत बोलत का नाही. प्रत्येक खेळाडूसाठी वेगळे नियम आहेत का?’
अभिषेक शर्माची सुमार कामगिरी
अभिषेक शर्माची या वर्षात कामगिरी काही खास राहिली नाही. त्याने या वर्षात खेळलेल्या 23 सामन्यात 23.36 च्या सरासरीने 514 धावा केल्या आहेत. त्याने पाच अर्धशतकं ठोकली आहेत. या पर्वात अभिषेक शर्माची सरासरी 19.1ची आहे. 10 सामन्यात त्याने 191 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत तर 11 धावा करू शकला. त्यामुळे अभिषेक शर्मावर दबाव वाढला. त्याच्यापेक्षा वैभव सूर्यवंशीची कामगिरी चांगली आहे. त्याने तीन सान्यात 151 धावा केल्या आणि प्लेयर ऑफ द सीरिजचा किताब जिंकला.
