एलॉन मस्क वापरत असलेल्या आयफोन 16 प्रोमध्ये खास काय?
एलॉन मस्कने निवडलेला आयफोन १६ प्रो नेमका इतका खास का आहे? अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि शानदार डिझाइन यामागे काही गुप्त कारण आहे का? मस्कसारखा तंत्रज्ञानप्रेमी हा फोन का वापरतोय, याचं उत्तर चला जाणून घेऊ.

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क हे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच डोनाल्ड ट्रंप यांच्या शपथविधी सोहळ्यात त्यांना आयफोन १६ प्रो वापरताना पाहिले गेले. त्यामुळे सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की मस्क वापरत असलेल्या या फोनमध्ये नेमकं काय विशेष आहे?
आयफोन १६ प्रो हा अॅपल कंपनीचा २०२४ मध्ये लाँच झालेला सर्वात प्रगत स्मार्टफोन आहे. यात अॅपलने ए१८ प्रो चिपसेट दिला आहे. ही चिप मागील ए१७ पेक्षा १५ टक्के जलद आणि २० टक्के जास्त ऊर्जा बचत करणारी आहे. त्यामुळे फोनचा परफॉर्मन्स आणि बॅटरी लाइफ दोन्ही सुधारले आहेत.
या फोनमध्ये ६.३ इंचांचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झच्या प्रोमोशन तंत्रज्ञानासोबत येतो. त्यामुळे स्क्रीन स्क्रोल करताना किंवा गेमिंग करताना अतिशय स्मूथ अनुभव मिळतो. याशिवाय, त्याचा डिस्प्ले सूर्यप्रकाशातही चांगला दिसतो.
कॅमेऱ्याच्या बाबतीत, आयफोन १६ प्रोमध्ये ४८ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. यात फ्यूजन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ अत्यंत स्पष्ट आणि प्रोफेशनल दर्जाचे येतात. तसेच ४के १२० एफपीएस व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय आणि स्टुडिओ क्वालिटी मायक्रोफोन दिले आहेत. जे व्हिडिओ शूटिंग आणि ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी परिपूर्ण आहेत.
आयफोन १६ प्रोमध्ये अॅपल इंटेलिजन्स नावाचं नवीन फिचरही आहे. जे ओपनएआयच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे फिचर फोनला अधिक स्मार्ट बनवते आणि वापरकर्त्याला वैयक्तिक सहाय्यकासारखा अनुभव देते. मात्र, याच ओपन एआयशी अॅपलच्या भागीदारीवर मस्क यांनी पूर्वी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांचा आयफोन वापरणे अधिकच चर्चेचा विषय ठरला आहे.
डिझाईनबाबत सांगायचं तर, आयफोन १६ प्रोमध्ये ग्रेड ५ टायटॅनियमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे फोन अधिक हलका, मजबूत आणि टिकाऊ झाला आहे. एलॉन मस्कसारख्या तंत्रज्ञानप्रेमी व्यक्तीने हा फोन निवडण्यामागे त्याची अत्याधुनिक फीचर्स आणि मजबूत परफॉर्मन्सचे मोठे कारण असण्याची शक्यता आहे.
