निवडणुकांदरम्यान ‘त्यांचं’ व्हॉट्सअॅप बंद होणार

निवडणुकांदरम्यान 'त्यांचं' व्हॉट्सअॅप बंद होणार

नवी दिल्ली : फेसबुकची मालकी असलेल्या ‘व्हॉट्सअॅप’ या मेसेजिंग अॅपवरील खोटे आणि असभ्य अकाऊंट लवकरच डिलीट करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी कंपनीतर्फे देण्यात आली. या अंतर्गत दर महिन्याला 2 मिलीअन म्हणजेच 20 लाख अकाउंट्स बंद करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष अनेक प्रकारच्या साधनांचा वापर करतात, त्यापैकीच एक म्हणजे सोशल मीडिया. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार आणि विरोधी पक्षांचा अपप्रचार केला जातो. राजकीय पक्षांकडून व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली असल्याचंही व्हॉट्सअॅपने सांगितलं. याबाबत राजकीय पक्षांशी बातचीत सुरु असून, जर ते अशाचप्रकारे व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग करत राहिले तर लवकरच त्यांचे अकाऊंट बंद करण्यात येणार असल्याचं व्हॉट्सअॅपने स्पष्ट केलं.

व्हॉट्सअॅपचे प्रसारण प्रमुख कार्ल वुग यांनी माध्यमांना सांगितले की, अनेक राजकीय पक्ष व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करतात, जे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्यांचे व्हॉट्सअॅप बंद करु शकतो.

निवडणुकांमध्ये व्हॉट्सअॅपचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, हे आम्हाला माहित आहे. आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांना थांबवण्यासाठी काम करत आहोत, असेही कार्ल वुग यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप्लिकेशन आहे. याचे जगभरात 1.5 बिलीअन म्हणजेच 150 कोटीहून अधिक युझर्स आहेत. मात्र गेल्या काही काळापासून व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होताना दिसून येत आहे. व्हॉट्सअॅपवर कुणीही लक्ष ठेवू शकत नाही, तसेच ते इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे की, त्याचा गैरवापर करुन सहजपणे लोकांमध्ये मतभेद निर्माण केले जाऊ शकतात आणि तेच होत आहे. व्हॉट्सअॅपवर अनेकदा सामाजिक अशांतता पसरवणारे मेसेजेच व्हायरल केले जातात. तसेच निवडणुकांमध्येही व्हॉट्सअॅपचा गैरवापर होतो. हाच गैरवापर रोखण्यासाठी आता असे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय व्हॉट्सअॅपने घेतला आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI