एकत्र या, भाजप नावाची आपत्ती घालवली पाहिजे : पवार
मुंबई : राजकीय विचार कुठलाही असू द्या, पण भाजपच्या विरोधकांनी एकत्र येऊन ताकद दाखवली पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केले. तसेच, भाजप ही एक आपत्ती आहे आणि ती आपण लवकरात लवकर घालवली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले. अखिल भारतीय किसान सभेने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शेतकरी हक्क परिषद भरवली होती. तिथे […]

मुंबई : राजकीय विचार कुठलाही असू द्या, पण भाजपच्या विरोधकांनी एकत्र येऊन ताकद दाखवली पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केले. तसेच, भाजप ही एक आपत्ती आहे आणि ती आपण लवकरात लवकर घालवली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले. अखिल भारतीय किसान सभेने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शेतकरी हक्क परिषद भरवली होती. तिथे शरद पवारांनी शेतीसह विविध विषयांवर रोखठोक मतं मांडली. यावेळी व्यासपीठावर किसान सभेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते.
शेतीच्या प्रश्नावर काय म्हणाले शरद पवार?
“दुष्काळ गंभीर आहे, शेतकरी, कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे. पण यावेळच्या राज्यकर्त्यांना कवडीची आस्था नाही. ना राज्य सरकारला आस्था आहे, ना केंद्र सरकारला आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांचं स्थलांतर होत आहे. सरकारला त्याचे घेणेदेणे नाही.”, असे म्हणत शरद पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, मोठमोठे उद्योजक कर्ज बुडवतात, पण शेतकरी कधीच कर्ज बुडवत नाही, असे म्हणत पवारांनी शेतकऱ्यांवरील विश्वासही व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंना टोला
“दुष्काळाचा एवढा मोठा प्रश्न आहे, पण चर्चा आता फक्त मंदिराच्या नावाची सुरु आहे. मंदिर-मशीद वाद घालून समाजात वाद वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. कुणी आता मग अयोध्येला जायला निघालंय.” असे म्हणत पवारांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
नोटाबंदीवर निशाणा
नोटाबंदीचा काहीही फायदा झाला नाही. कुठलाही काळा पैसा बाहेर आला नाही. उलट देशाचा विकास दर घसरला. नोटाबंदीची मोठी किंमत अर्थव्यवस्थेला मोजावी लागली आहे, असे मत पवारांनी मांडले. तसेच, संविधानिक संस्थांच्या स्वायत्ततेवर हल्ला करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आरबीआयवर हल्ला करण्याचा प्रयत्न करुन दुर्बल करण्याचा प्रयत्न केला गेला, असेही पवार म्हणाले.
