तिसऱ्या मजल्यावर लटकली होती चिमुकली, जवान आला धावून… काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ
पुण्यातील कात्रजच्या गुजर निंबाळकरवाडी, खोपडे नगर येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये एका चार वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून पडण्यापासून थोडक्यात वाचवण्यात आले, याचे श्रेय सुट्टीवर असलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याच्या तत्परतेला जाते.

सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील घटना अक्षरश: काळीज पिळवटून टाकणारी आहे. मंगळवारी सकाळी 9:06च्या सुमारास कात्रजच्या गुजर निंबाळकरवाडी, खोपडे नगर येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. एक लहान चिमुकली तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीत लटकली होती. तिला सुट्टीवर असलेल्या एका जवानाने वाचवले आहे. आता नेमकं काय झालं जाणून घ्या…
नेमकं काय झालं?
पुणे अग्निशमन दलाचे कर्मचारी योगेश अर्जुन चव्हाण, जे सध्या सुट्टीवर आहेत, यांना शेजारी उमेश सुतार यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आपल्या गॅलरीकडे धावत जाऊन चव्हाण यांनी पाहिले की, लहान मुलगी बाविका चांदणे ही तिसऱ्या मजल्यावरील बंद फ्लॅटच्या खिडकीत अडकली आहे आणि बाहेर चढण्याचा प्रयत्न करत आहे. क्षणाचाही विलंब न करता चव्हाण यांनी इमारतीकडे धाव घेतली.
वाचा: सूर्य-केतूचे होणार गोचर! ‘या’ 3 राशींसाठी उघडणार संपत्तीचा खजिना; सगळ्या इच्छा होणार पूर्ण
#PMCPune आज कोथरूड अग्निशमन केंद्रातील सुट्टी असलेला जवान योगेश चव्हाण यांनी काञज, गुजरवाडी, खोपडे नगर येथील एका इमारतीत 3 मजल्यावर घर बंद असताना एक छोटी मुलगी खिडकीतून पडण्याच्या स्थितीत दिसताच तातडीने जवानाने धाव घेत 4 वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचवत आपले कर्तव्य बजावले #punefire pic.twitter.com/zS06tsxf4C
— Nilesh Sharad Mahajan (@Nileshmahajn101) July 8, 2025
मुलीला घरात खेचून घेतलं
योगेश तिसऱ्या मजल्यावर पोहोचले तेव्हा घराला कुलूप होते. बाविकाची आई घराला कुलूप लावून मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. योगेश त्यांच्या येण्याची वाट पाहात होते. बाविकाची आई घरी येताच त्यांनी तातडीने घराचे दार उघडले आणि बेडरुमच्या खिडकीत लटकत असलेल्या चिमुकलीकडे धाव घेतली. त्यांनी तातडीने मुलीला बेडरूमच्या खिडकीतून आत ओढून घेतले आणि तिचा जीव वाचवला.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या दिसत आहे. मुलगी खिडकीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर एक माणूस “बच्चा गिर रहा है (बाळ पडत आहे)” असे ओरडत आहे. त्यानंतर एक पुरुष आणि एक स्त्री खिडकीजवळ येऊन बाळाला आत घेताना दिसतात. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
