प्रेयसीने हट्ट पुरवले इतके की भाऊ आता तुरुंगात फोडतोय खडे! अजब प्रेमाची गजब गोष्ट
Ajab Prem, Gjab Kahani : भावाला गर्लफ्रेंड तर इतकी खास मिळाली होती की, याने तोंडातून शब्द काढावा ती त्याची इच्छा पूर्ण करत होती. मोबाईल, बाईक, मोठ्या हॉटेलमध्ये जेवण, सगळा कसा थाट होता, पण आता या प्रेमाची शिक्षा त्याला सहन करावी लागत आहे.

तरुणीची, प्रेयसीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भिकारे झालेले मित्र तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. इतक्या ठिकाणी त्यांच्या उधारी असतात की त्याची त्यांना कल्पना नसते. प्रियकर प्रेयसीला महागडे गिफ्ट देतो. तिच्या अवती-भवती पिंगा घालतो. पण या प्रकरणात सर्वच विरुद्ध होतं. तो तिच्या गळ्यातील ताईत होता. त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार असायची. भावाला गर्लफ्रेंड तर इतकी खास मिळाली होती की, याने तोंडातून शब्द काढावा ती त्याची इच्छा पूर्ण करत होती. मोबाईल, बाईक, मोठ्या हॉटेलमध्ये जेवण, सगळा कसा थाट होता, पण आता या प्रेमाची शिक्षा त्याला सहन करावी लागत आहे.
हे प्रकरण तरी काय?
तर हे प्रकरण आहे उत्तर प्रदेशातील बहराईच या शहरातील. येथील काजीपूरा येथील शाहिद सगीर यांच्या घरात चोरी झाली होती. त्यांच्या घरातील या चोरीमागे शेजारील मुलीचा हात असल्याचा त्यांचा संशय होता. पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा आरोपी ही शेजारील मुलगीच असल्याचे पुरावे मिळाले. तर या तरुणीने शेजारील घरातील सोने-चांदीसह 40 हजारांवर हात साफ केला होता. तिने मोठे कांड केले होते. पण तपास पुढे गेल्यावर पोलिसांना खरा धक्का बसला.
बॉयफ्रेंडची हौस पूर्ण करण्यासाठी चोरी
तर ही तरुणी त्या तरुणाच्या प्रेमात अकंठ बुडाली होती. तो सोडून जाऊ नये यासाठी ती त्याची हौस पूर्ण करायची. त्याने मागितले आणि हिने दिले नाही असे सहसा झाले नाही. त्यासाठी मग तिने नामी युक्ती शोधली. ती लोकांच्या घरात धुणे-भांडे, साफसफाईची कामं करू लागली. याच दरम्यान ती या घरांमध्ये चोरी करू लागली. तिने एका घरात तर 7-8 लाखांवर हात साफ केला होता. इतकेच नाही तर जिथे ती भाडेकरू होती तिथल्या मालकाला सुद्धा तिने इंगा दाखवला होता. त्याच्याच चोरलेल्या पैशांतून ती भाडं भरत होती.
बबलीसह तिचा बंटी कारागृहात
चोरलेल्या पैशातून तिने प्रियकराला 1 लाख 27 हजारांची रायडर बाईक, मोबाईल, सोन्याची चैन आणि इतर अनेक महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. आपण चांगल्या ठिकाणी काम करत असल्याची ती त्याला सांगत होती. सोने-चांदी चोरल्यानंतर ती दुसर्या शहरात त्याची विक्री करत होती. पोलिसांनी ज्या सोनाराला तिने हे दागिने विक्री केले. त्याच्याकडून ते हस्तगत केले. या तरुणीच्या घरातून उर्वरीत रोख रक्कम आणि काही दागिने जप्त करण्यात आले. आता बबलीसह तिचा बंटी कारागृहात आहे.