Video: लाथा-बुक्क्यांनी मारहाण! कोर्टाच्या परिसरातच दे दणादण, वकिलांमध्येच… व्हिडीओमुळे खळबळ
Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन वकिलांमध्येच माहरहाण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईतील अंधेरी न्यायालय परिसरात आज एक धक्कादायक आणि अतिशय गंभीर घटना घडली. दोन वकिलांमध्ये कोर्टरूममध्येच हिंसक मारहाण झाली. ही मारामारी चित्रपटातील अॅक्शन दृश्यांसारखी दिसत होती. वकील वाहिद शेख यांनी आपले सहकारी वकील अभिषेक त्रिपाठी यांना कोर्टरूममध्ये ओढत नेले आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी न्यायालयातील शिस्त, सुरक्षितता आणि वकिलांच्या वर्तनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नेमकं काय घडलं?
घटना अंधेरीच्या सत्र न्यायालयात (Sessions Court) घडली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन्ही वकिलांमध्ये काही कारणास्तव वाद सुरू झाला. वाद इतका तीव्र झाला की वकील वाहिद शेख यांनी अभिषेक त्रिपाठी यांना जबरदस्तीने ओढत नेले आणि कोर्टरूमच्या आतच लाथा-बुक्क्यांचा वर्षाव केला. व्हिडीओमध्ये दिसते की, एक वकील दुसऱ्याला पकडून मारतो आणि जोरदार लाथा मारतो. तर दुसरा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. ही मारहाण इतकी तीव्र होती की आसपासचे लोक आणि कोर्ट स्टाफला धावून जावे लागले. काही क्षणांतच परिसरात खळबळ माजली.
Video: दोन वकिलांमध्येच झाली मारामारी pic.twitter.com/JO85Kc50OZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 24, 2026
ही घटना न्यायालयाच्या आत घडली असल्याने ती अधिक गंभीर मानली जात आहे. न्यायालय हे न्याय मिळवण्याचे पवित्र स्थळ असते, परंतु येथे वकिलांनीच हिंसाचार केल्याने न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने हटले आहे की, “कोर्टात न्याय मिळवून देणारे लोकच एकमेकांना मारतायत, मग सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार?” असे प्रश्न विचारले जात आहेत.
पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, दोन्ही वकिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अंधेरी पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले की, संबंधित व्हिडीओ आणि साक्षीदारांच्या जबानीवरून तपास सुरू आहे. दोघांनाही समन्स बजावले जाणार असून, न्यायालयीन कारवाईतही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनीही या घटनेची दखल घेतली असल्याचे म्हटले जाते. दोन्ही वकिलांच्या वर्तनावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही घटना फक्त एका मारहाणीपुरती मर्यादित नसून, न्यायव्यवस्थेतील नैतिकता, शिस्त आणि व्यावसायिक वर्तनाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकते. अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी बार असोसिएशन आणि न्यायालय प्रशासनाने एकत्र येऊन कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.
