पप्पा, आम्ही वाचणार नाही… ढगफूटी आधी आला होता शेवटचा कॉल, उत्तरकाशीमधील काळीज पिळवटून टाकणारी घटना
बुधवारी काली देवी आणि विजय सिंह पायी चालत गंगवाडीला गेले होते, पण पूल वाहून गेल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. ढगफूटीच्या आधी काली देवी आणि विजय सिंह यांना मुलाचा फोन आला होता.

पप्पा, आम्ही वाचणार नाही… नाल्यात खूप पाणी आलंय… हर्षिलमधून त्यांच्या मुलाचा दोन मिनिटांचा हा शेवटचा कॉल आठवून नेपाळमधील काली देवी आणि त्यांचे पती विजय सिंह रडत आहेत. नेपाळच्या रहिवासी असलेल्या काली देवी ५ तारखेला दुपारी १२ वाजता भटवाडीसाठी निघाल्या होत्या. त्या आणि त्यांचे पती वाचले, पण त्यांच्या २६ जणांच्या गटातील इतर कोणाशीही आता संपर्क होऊ शकलेला नाही. हर्षिल खोऱ्यात मजुरीसाठी थांबलेले २६ नेपाळी मजूर होते.
हेलिपॅडवर बसून रडतेय माऊली
काली देवी ५ तारखेला सकाळी ११ च्या सुमारास भटवाडीला जाण्यासाठी हर्षिल खोऱ्यातून निघाल्या होत्या. पण इतका मोठा पूर येईल याची त्यांना कल्पना नव्हती. काली देवी म्हणाल्या, जर मला माहीत असतं की असा मोठा पूर येणार आहे, तर मी आलेच नसते. त्या सतत भटवाडी हेलिपॅडवर बसून रडत आहेत आणि म्हणत आहेत की सरकारकडे फक्त एवढीच विनंती आहे की आम्हाला हर्षिल खोऱ्यात सोडा, आम्ही स्वतः आमच्या मुलांना शोधू.
वाचा: माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झालंय आणि…; चर्चांवर अखेर सोनाली कुलकर्णीनं सोडलं मौन
काल काली देवी आणि विजय सिंह पायी चालत गंगवाडीला गेले होते, पण पूल वाहून गेल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. हर्षिल खोऱ्यात रस्ते आणि पूल बांधण्याचे काम सुरू होते. त्या वेळी तिथे लष्कर आणि अनेक मजूर काम करत होते, पण हर्षिलमध्ये दुपारी तीन वाजता आलेल्या पुराने सर्व काही उद्ध्वस्त केले.
गंगवाडीपासून पुढे रस्ता बंद झाल्याने हर्षिल खोऱ्याचा संपर्क तुटला
उत्तरकाशीपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या हर्षिल खोऱ्याला सामरिक महत्त्व आहे, त्यामुळे तिथे लष्कराचा बेस कॅम्प आहे. लष्कराचे ११ जवानही वाहून गेले होते, त्यापैकी दोन जवानांना वाचवण्यात यश आले आहे, तर नऊ जण अजूनही बेपत्ता आहेत. भटवाडीपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेला १०० मीटर लांबीचा लोखंडी पूल पूर्णपणे गायब झाला आहे.
भागीरथी नदीचा वेग इतका आहे की मोठमोठे दगडही तिने वाहून नेले. गंगवाडीमध्ये जिथे पूल होता, तिथे सुमारे २५-३० मीटर खोल दरी आहे. यामुळेच NDRF, SDRF आणि प्रशासन जमिनीच्या मार्गाने तिथे पोहोचू शकले नाही. NDRF ने ही दरी ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण तासन्तास मेहनत करूनही ते पार करू शकले नाहीत. आता लष्कराची मदत घेण्याचा विचार सुरू आहे.
