Ghibli नंतर आता AI बार्बी बॉक्स ट्रेंड! सोशल मीडियावर क्रेझ का? वाचा सविस्तर
हा ट्रेंड मजेदार आणि सर्जनशील आहे, यात शंका नाही. पण यामागील काही मुद्दे विचार करायला लावणारे आहेत. AI इमेज जनरेशनसाठी प्रचंड ऊर्जा लागते. तज्ज्ञांच्या मते, एका AI इमेजसाठी लागणारी ऊर्जा ही गुगल सर्चच्या १० पट आहे.

सोशल मीडियावर सध्या एक नवा ट्रेंड जोरात सुरू आहे. ज्याचं नाव आहे, बार्बी बॉक्स ट्रेंड! यात युजर्स आपल्या फोटोंना AI च्या मदतीने बार्बी किंवा ॲक्शन फिगरसारख्या खेळण्यात बदलतात. हे खेळणे रंगीत प्लास्टिक बॉक्समध्ये बंद केलेले दिसते, जणू दुकानात विक्रीसाठी ठेवलेय. हा ट्रेंड घिबली स्टुडिओ-शैलीतील AI चित्रांनंतर आला. आता युजर्स आपली सर्जनशीलता आणि नॉस्टॅल्जियाचा वापर करून अनोखे अवतार तयार करत आहेत. ‘हाय बार्बी’ म्हणत युजर्स बार्बी, केन किंवा मार्व्हलच्या सुपरहिरोसारखे अवतार बनवत आहेत. तुम्हालाही हा ट्रेंड जॉइन करायचाय? चला, जाणून घेऊया काय आहे हा ट्रेंड आणि कसा बनवायचा स्वतःचा AI अवतार.
बार्बी बॉक्स ट्रेंड म्हणजे काय?
हा ट्रेंड २०२५ च्या सुरुवातीला सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात ChatGPT सारख्या AI टूल्सचा वापर करून युजर्स आपल्या फोटोंना खेळण्यांच्या बॉक्समधील बार्बी किंवा ॲक्शन फिगरमध्ये बदलतात. हे अवतार १९९० आणि २००० च्या दशकातील बार्बी जाहिरातींसारखे दिसतात. यात तुमचे नाव, आवडीच्या ॲक्सेसरीज आणि मजेदार स्लोगन्स असलेला रंगीत बॉक्स असतो. हा ट्रेंड प्रथम लिंक्डइनवर सुरू झाला. नंतर तो इन्स्टाग्राम, टिकटॉक, X आणि फेसबुकवर पसरला. #BarbieBoxChallenge आणि #AIDoll या हॅशटॅग्सनी लाखो युजर्सनी आपले अवतार शेअर केले. खास गोष्ट म्हणजे, यात तुम्ही स्वतःला बार्बी, सुपरहिरो किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार कलेक्टिबल खेळणे बनवू शकता.
स्वतःचा AI बार्बी अवतार कसा बनवायचा?
1. ChatGPT उघडा: ChatGPT ॲप किंवा वेबसाइटवर जा. लॉगिन करा किंवा नवीन अकाउंट बनवा.
2. फोटो अपलोड करा: तुमचा स्पष्ट, हाय-रिझोल्यूशन फोटो अपलोड करा. फुल-बॉडी फोटो असल्यास उत्तम. यात तुमचा आउटफिट आणि स्टाइल स्पष्ट दिसावी. धूसर किंवा गडद फोटोंचा वापर टाळा.
3. प्रॉम्प्ट लिहा: AI ला सूचना देण्यासाठी तपशीलवार प्रॉम्प्ट लिहा. उदाहरणार्थ: “हा फोटो रंगीत प्लास्टिक टॉय बॉक्समधील बार्बी ॲक्शन फिगरमध्ये बदला. ॲक्सेसरीजमध्ये कॅमेरा, सनग्लासेस आणि स्केटबोर्ड असू दे. बॉक्सवर माझे नाव आणि ‘एडवेंचर मोड ऑन!’ हा स्लोगन लिहा. गुलाबी आणि निळ्या रंगांचा वापर करा.”
4. डिझाइन सुधारा: पहिला रिझल्ट आवडला नाही? काळजी नको. प्रॉम्प्टमध्ये बदल करा. रंग, ॲक्सेसरीज किंवा बॉक्स डिझाइन बदला.
5. शेअर करा: तुमचा अवतार तयार झाला की तो डाउनलोड करा. #BarbieBoxChallenge किंवा #AIDoll हॅशटॅग्ससह टिकटॉक, इन्स्टाग्राम किंवा X वर शेअर करा.
ट्रेंडची क्रेझ आणि सेलिब्रिटींचा सहभाग
हा ट्रेंड इतका लोकप्रिय झाला की अनेक सेलिब्रिटी आणि ब्रँड्सनीही यात भाग घेतला. अमेरिकन अभिनेत्री ब्रूक शील्ड्सने तिचा ॲक्शन फिगर शेअर केला, ज्यामध्ये नीडलपॉइंट किट आणि तिच्या पाळीव कुत्र्याचा समावेश होता. अमेरिकन खासदार मार्जोरी टेलर ग्रीनने तिचा अवतार गॅव्हल आणि बायबलसह बनवला. मारिओ बॅडेस्क्यू आणि युके च्या रॉयल मेल सारख्या ब्रँड्सनी आपल्या प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीसाठी हा ट्रेंड वापरला. भारतातही अनेक इन्फ्लुएन्सर्स आणि बॉलीवूड सेलिब्रिटींनी आपले बार्बी अवतार शेअर केले. उदाहरणार्थ, ‘ओम शांति ओम’ ची शांती किंवा मेरी कोम यांचे AI अवतार व्हायरल झाले.
