नवीन पाळीव प्राणी घ्यायचा विचार करताय? आधी खर्च वाचा
भारतीय कुटुंबे दरवर्षी त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी सुमारे ₹1.5 लाखांपर्यंत खर्च करतात. या खर्चामध्ये उत्तम दर्जाचं खाद्य, स्वच्छतेसाठी आवश्यक ग्रूमिंग, वेळोवेळी लागणारा वैद्यकीय उपचार व लसीकरण, तसेच घराबाहेर गेल्यास बोर्डिंगची सुविधा यांचा समावेश होतो. त्यामुळे तुम्हालाही पाळीव प्राणी घेण्याचा विचार असला, तर हा संपूर्ण खर्चाचा अंदाज आधी जरूर जाणून घ्या!

पालतू प्राणी म्हणजे केवळ एक जनावर नव्हे, तर तो आपल्या घरातला खास सदस्य असतो. डोळ्यांत निरागसता, वर्तनात खेळकरपणा आणि अंत:करणात निष्ठा घेऊन येणारा हा छोटासा जीव घरात पाऊल टाकतो तेव्हा, तो आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतो. पण, या प्रेमळ सदस्याच्या देखभालीसाठी दरवर्षी किती खर्च होतो हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. एका अभ्यासानुसार, भारतीय कुटुंबे त्यांच्या पाळीव प्राण्याच्या काळजीसाठी सरासरी १.५ लाख रुपये खर्च करतात.
खरचं किती असतो ?
आजच्या काळात पाळीव प्राणी पाळणं केवळ हौस राहिलेली नाही. डॉगी, मांजर, खरगोश, पोपट यांना अनेकजण मुलांसारखं जपतात. त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी खर्च करण्याची मानसिकता आता समाजात रुजलेली आहे. त्यांच्या अन्नापासून ते तब्येतीच्या तपासणीपर्यंत, खेळण्यांपासून ते सुट्टीच्या काळात ठेवण्याच्या व्यवस्थांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये भरपूर खर्च होतो.
पेट फूड
चांगल्या दर्जाचं डॉग किंवा कॅट फूड स्वस्तात मिळत नाही. दरमहा ४,००० ते १०,००० रुपयांपर्यंत फक्त अन्नासाठी खर्च होतो. काही ठिकाणी हा खर्च २,००० – ५,००० रुपयांदरम्यान असतो, तर काही मालक त्यांच्या प्राण्यांना प्रीमियम डायट देतात, ज्यामुळे खर्च आणखी वाढतो.
आरोग्य आणि लसीकरण
पाळीव प्राण्यांची आरोग्य चाचणी, लसीकरण, डी-वॉर्मिंग हे नियमित करावंच लागतं. एकदा व्हेटरनरी डॉक्टरकडे गेलं तरी ५०० ते १,५०० रुपये खर्च येतो. काही वेळा आजार झाल्यास उपचारासाठी हजारो रुपये लागतात.
ग्रूमिंग
पाळीव प्राण्यांना अंघोळ घालणे, केस कापणे, नखं साफ करणे यासाठीही दरवेळी १,००० ते २,००० रुपये खर्च येतो. विशेषतः शहरांमध्ये ही सेवा आणखी महाग आहे.
खेळणी, कपडे आणि अॅक्सेसरीज
प्रत्येक खेळणं, कॉलर, सॉफ्ट बेड, उबदार कपडे यासाठी मासिक १,००० – २,००० रुपयांचा खर्च सहज होतो. ही उत्पादने अनेक वेळा फॅन्सी ब्रँडेड असतात.
बोर्डिंग आणि पेट सिटर
जर तुम्ही बाहेरगावी चालले असाल, तर प्राण्याची व्यवस्था करणं महत्त्वाचं ठरतं. पेट बोर्डिंगसाठी किंवा सिटरसाठी एका दिवसाचा खर्च ५०० ते १,००० रुपयांपर्यंत जातो. काही ठिकाणी तर महिन्याचं पॅकेज हजारोंमध्ये असतं.
संपूर्ण देखभालीचा खर्च
या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करता, एका वर्षात पाळीव प्राण्याच्या देखभालीसाठी १.५ लाख रुपये खर्च होणे ही बाब अनेक घरांमध्ये आता सामान्य झाली आहे. यात अतिरिक्त खर्च जसे की ट्रेनिंग, स्पेशल मेडिकल केअर, ट्रॅव्हलिंगसाठी अॅक्सेसरीज वगैरेही धरले, तर खर्च आणखी वाढू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
