सूर्याचे आयुष्य किती उरले आहे, त्याचा अंत कधी होईल आणि तेव्हा पृथ्वीवर काय घडेल?
आपल्या सौरमंडळाला ऊर्जा देणारा सूर्य 'म्हातारा' होत आहे. त्याचे आयुष्य किती आहे, तो कधीपर्यंत प्रकाश देईल आणि त्याचा अंत झाल्यावर पृथ्वीवर काय परिणाम होतील, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर चला जाणून घेऊया...

सूर्यप्रकाशाशिवाय जीवनाची कल्पना करणेही अशक्य आहे. आपल्या संपूर्ण सौरमंडळाला ऊर्जा देणारा सूर्य, हळूहळू ‘म्हातारा’ होत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सूर्य, नक्की किती वर्षांचा आहे, तो कधीपर्यंत असाच प्रकाश देत राहील आणि त्याचा अंत झाल्यावर पृथ्वीवर काय परिणाम होतील, याबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येतात.
आपल्याला हे तर माहीत आहे की सूर्य हा आगीचा एक प्रचंड मोठा गोळा आहे, जो सतत ऊर्जा निर्माण करतो. पण या सूर्याचे आयुष्य किती आहे आणि तो किती काळ अस्तित्वात राहील? सूर्य, जो आपली पृथ्वी आणि संपूर्ण सौरमंडळाचा केंद्रबिंदू आहे, तो ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. सूर्य हा देखील एक तारा आहे आणि प्रत्येक ताऱ्याचे स्वतःचे एक आयुष्य असते. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, सूर्य सुमारे 4.6 अब्ज (460 कोटी) वर्षांपूर्वी जन्माला आला आहे.
सूर्याचे सध्याचे वय आणि भविष्यातील आयुष्य
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सूर्य सध्या त्याच्या आयुष्याच्या मध्य टप्प्यात आहे. तो अजूनही ‘म्हातारा’ झालेला नाही. नासाच्या माहितीनुसार, सूर्य अजूनही सुमारे 5 अब्ज (500 कोटी) वर्षे जगणार आहे. सूर्याचे एकूण आयुष्य 9 ते 10 अब्ज वर्षांचे (900 ते 1000 कोटी) मानले जाते.
सूर्याच्या अंताची प्रक्रिया आणि पृथ्वीवरील परिणाम
जेव्हा सूर्याचे आयुष्य संपत येईल, तेव्हा तो सध्याच्या आगीच्या गोळ्यासारखा राहणार नाही. शास्त्रज्ञांच्या मते, तो आतापेक्षा २००० पट अधिक तेजस्वी होईल. सूर्याच्या आत हायड्रोजन वायूचे अणू एकमेकांमध्ये मिसळून हेलियम तयार करतात, ज्यामुळे प्रचंड ऊर्जा निर्माण होते. हीच प्रक्रिया सूर्याला तेजस्वी ठेवते.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, जेव्हा सूर्याचे आयुष्य संपत येईल, तेव्हा त्याच्या अंतिम टप्प्यात तो बुध आणि शुक्र यांसारख्या ग्रहांना आपल्या प्रचंड उष्णतेने आणि आकारमानाने गिळून टाकेल. त्यावेळी आपली पृथ्वी कदाचित तिच्या सध्याच्या कक्षेपलीकडे सरकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती थोडीफार वाचू शकेल. मात्र, असे असले तरी पृथ्वीचे पूर्णपणे वाचण्याची शक्यता फारच कमी असेल.
याचा अर्थ असा की, जेव्हा सूर्याचा अंत होईल, तेव्हा आपली पृथ्वी देखील नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात, ज्या ताऱ्याभोवती पृथ्वी फिरत आहे, तोच तारा तिच्या विनाशाचे कारण बनेल. हे एक नैसर्गिक चक्र असून, कोट्यवधी वर्षांच्या अंतराने घडणारी ही घटना मानवी आयुष्याच्या कल्पनेपलीकडील आहे. तरीही, आपल्या सौरमंडळाच्या भविष्याबद्दल जाणून घेणे नेहमीच उत्सुकतेचे असते.
