2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर… दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणी ५०० कोटींची मानहानी नोटीस बजावण्यात आली आहे. यावर त्यांचे वकील वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरदेसाईंनी एसआयटी आणि सीबीआयच्या तपास अहवालांचा हवाला देत म्हटले की, सर्व आरोपांमध्ये कोणतेही पुरावे आढळले नाहीत आणि दिशाच्या वडिलांनीही पूर्वी संशय व्यक्त केला नव्हता.
आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन प्रकरणी ५०० कोटी रुपयांची मानहानी नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस दिशाचे वडील सतीश सालियन यांच्यावतीने देण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंचे वकील वरुण सरदेसाई यांनी नोटीस स्वीकारली असून, त्यातील आरोपांचे खंडन केले आहे. वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षांपासून आदित्य ठाकरेंवर असे बिनबुडाचे आरोप वारंवार केले जात आहेत. सरदेसाईंनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा संदर्भ दिला, जिथे सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि कोणताही पुरावा मिळाला नाही. दिशा सालियन प्रकरणीही, २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात एडीआर दाखल करून तपासात आत्महत्येचे स्पष्ट प्रकरण असल्याचे नमूद केले होते.
२०२२ मध्ये सरकार बदलल्यानंतर, २०२२ मध्ये घोषित करण्यात आलेल्या आणि २०२३ मध्ये स्थापन झालेल्या एसआयटीने (विशेष तपास पथक) या प्रकरणाची पुन्हा चौकशी केली. या एसआयटीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. एसआयटीने १४ जून २०२४ रोजी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, पूर्वीचा तपास योग्य होता आणि त्यांना कोणतीही तफावत आढळली नाही. तसेच, सतीश सालियन यांनीही अनेक वेळा जबाब नोंदवताना मुलीच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता.
