अजित पवार विमान अपघात; रोहित पवारांकडून मंत्री राम मोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी
अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. व्हीएसआर कंपनीशी टीडीपीचा संबंध असून चौकशीत फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहनही रोहित पवारांनी केले आहे.
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांनी नवी मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली. रोहित पवारांनी आरोप केला आहे की, ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानाच्या अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला, त्या कंपनीशी सत्ताधाऱ्यांचा संबंध आहे. तसेच, नायडू ज्या पक्षाचे खासदार आहेत, त्या तेलुगू देसम पार्टीच्या (टीडीपी) एका नेत्याने व्हीएसआर कंपनीला कर्ज दिले असल्याचा दावाही त्यांनी केला. यामुळे विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत असून तपासात फेरफार केला जात असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालून अजित पवारांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे.
Published on: Feb 22, 2026 11:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
