Pratap Sarnaik | मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा, नवं धोरण काय?
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राज्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे संकेत मिळाले आहेत.
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून राज्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. मुळात 1 मे 2026, महाराष्ट्र दिनापासून मुंबईतील रिक्षाचालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय लागू होणार होता. मात्र, नव्या घडामोडीनुसार ही सक्ती तत्काळ लागू न करता काही काळासाठी पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या कालावधीत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याचेही सांगितले जात आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि अस्वस्थता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. रिक्षा संघटनांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्याचाही या निर्णयावर परिणाम झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसून अंतिम निर्णय उद्या घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “मराठी शिकणं आवश्यक आहे, त्याला पर्याय नाही. मुदत दिली तरी ती पाळून भाषा शिकली पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला.
आज झालेल्या बैठकीत रिक्षाचालक प्रतिनिधींनी मंत्रींची भूमिका मान्य केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.