ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींनी जागतिक प्रशासन सुधारणांवर जोर दिला. त्यांनी पिरॅमिड ऑफ प्रिव्हिलेजला प्लॅटफॉर्म ऑफ पार्टनरशिपमध्ये बदलण्याचे आवाहन केले, जिथे प्रत्येक देशाचा आवाज असेल. ग्लोबल साऊथला रूल टेकरऐवजी रूल शेपर बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक प्रशासनाच्या सध्याच्या रचनेत सुधारणा घडवण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी सध्याची पिरॅमिडसारखी रचना बदलून प्लॅटफॉर्म ऑफ पार्टनरशिप (भागीदारीच्या व्यासपीठा) मध्ये रूपांतरित करण्याचे आवाहन केले. या व्यासपीठावर प्रत्येक देशाचा आवाज असेल आणि मानवतेच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवले जाईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी ग्लोबल साऊथच्या (विकसनशील देशांच्या) भूमिकेवर विशेष लक्ष वेधले. ग्लोबल साऊथ आज जागतिक संकटांच्या आघाडीवर असतानाही निर्णय प्रक्रियेत मात्र ते मागे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांना नियम स्वीकारणारे (रूल टेकर) न राहता नियम घडवणारे (रूल शेपर) बनवण्यासाठी ब्रिक्सने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
या उद्देशाने, त्यांनी जागतिक प्रशासनात सुधारणा घडवण्यासाठी १० प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली. यात प्रतिनिधित्व, प्रतिसाद आणि नियम निर्मिती या तीन मुख्य पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. सुरक्षा परिषदेतील सुधारणा, आर्थिक संस्थांमधील समान प्रतिनिधित्व आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे नियम ठरवण्यात ग्लोबल साऊथचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
