Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दलाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दलाला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. दिल्ली पोलीस आयुक्तालयाने सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. हा आदेश कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच लागू असणार आहे.
आदेशानुसार, सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला सामान्य रजा, अर्जित रजा किंवा इतर नियमित सुट्ट्या मंजूर केल्या जाणार नाहीत. केवळ अत्यंत आपत्कालीन परिस्थितीतच सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सुट्टी दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, दिल्ली पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पोलीस आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रशिक्षण, अभ्यासक्रम किंवा अधिकृत कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.
दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना या आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
