दिवंगत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा

दिवंगत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा

| Updated on: Mar 06, 2026 | 2:46 PM

देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच, त्यांच्या कार्याची दखल म्हणून गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्याचे जाहीर केले. २०२६ चा अर्थसंकल्प अजित पवारांच्या स्मृतींना समर्पित करत, फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या प्रगती आणि संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाच्या संवर्धनाबद्दलही माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात दिवंगत राज्याचे लाडके नेते अजित पवार यांना आदरांजली वाहिली. पवार यांनी सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळली होती. राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

अजित पवार यांनी एकूण अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला होता, ज्यामुळे अजित दादा व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्यामुळे महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली म्हणून, सर्व मान्यवरांशी चर्चा करून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. तसेच, त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असेही ते म्हणाले. आजचा हा अर्थसंकल्प दिवंगत अजित दादांच्या स्मृतींना समर्पित करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

याशिवाय, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त त्यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचे दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहितीही त्यांनी दिली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू येथील जन्मस्थानाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा हाती घेण्याची घोषणाही त्यांनी केली.

Published on: Mar 06, 2026 02:46 PM
Follow Us