Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
मुंबईतील चेंबूर परिसरात आज एक धक्कादायक अपघात घडला. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या घटनेत किमान 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबईतील चेंबूर परिसरात आज एक धक्कादायक अपघात घडला. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या घटनेत किमान 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. झाड थेट बसवर कोसळल्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. “मी आत्ताच राहुल शेवाळे आणि तुकाराम काते यांच्याशी बोललो आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच जखमी विद्यार्थ्यांवर योग्य उपचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. दुःखद बाब म्हणजे यामध्ये एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
