Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर

Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर

| Updated on: Jun 22, 2026 | 1:13 PM

विधान परिषद निवडणुकीच्या निकालात महायुतीने राज्यभर वर्चस्व राखले असले तरी नाशिकमधील निकालाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे असलेल्या नाशिक विधान परिषद जागेवर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नाशिकच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गीते बंधूंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे बदलली. मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोकुळ गीते यांच्याशी संवाद साधत समन्वयाचा प्रयत्न केला. मात्र गीते यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली.

जरी गोकुळ गीते यांनी प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नसल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांच्या समर्थकांनी स्थानिक स्तरावर प्रभावी मोर्चेबांधणी केल्याची चर्चा होती. अखेर मतदारांनी त्यांच्याच बाजूने कौल दिला आणि त्यांनी विजय मिळवला.

निकालानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय महायुतीतील इतर सर्व नेत्यांनी माझा विश्वासघात केला,” असा आरोप त्यांनी केला. तसेच पडद्यामागून आपला पराभव घडवून आणल्याचाही दावा त्यांनी केला.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी हा निकाल धक्कादायक असल्याचे सांगत संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. दुसरीकडे गोकुळ गीते यांच्या विजयाचा जल्लोष समर्थकांकडून करण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला असून, विजयाची घोषणा होताच त्यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

नाशिकमधील या निकालामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारण, समन्वय आणि नेतृत्वाच्या भूमिकांवर नव्याने प्रश्न उपस्थित होत असून, आगामी काळात या निकालाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 22, 2026 1:13 PM
Follow Us