Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच महाराष्ट्र काँग्रेसमध्येही अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही नाराज नेत्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे दाद मागितली आहे.
राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच महाराष्ट्र काँग्रेसमध्येही अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काही नाराज नेत्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे दाद मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर आणि मराठवाडा विभागातील काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच आज राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठीही वेळ मागण्यात आली असून, त्यांच्यासमोरही सपकाळ यांच्या नेतृत्वाविरोधातील भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती आहे.
नाराज गटात माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, नेते संजय राठोड, माजी खासदार तुकाराम रेंगे यांच्यासह अनेक जिल्हास्तरीय नेत्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व नेते मुख्यतः नागपूर आणि मराठवाडा विभागातील आहेत.
नाराज नेत्यांचा आरोप आहे की, गेल्या काही महिन्यांत पक्ष संघटना कमकुवत झाली असून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही आणि संघटनात्मक पातळीवर पक्षाची एकजूट ढासळल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज असल्याचा दावा या गटाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, यापूर्वीही काही आमदार आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी सपकाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र आता नाराजी अधिक संघटित स्वरूपात समोर येत असल्याने महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाला वेग आला आहे.
राहुल गांधी यांच्यासोबत होणाऱ्या संभाव्य बैठकीत काय चर्चा होते आणि पक्षश्रेष्ठी यावर कोणती भूमिका घेतात, याकडे राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
