उद्धव ठाकरेंचा ‘तो’ प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला; युतीत तणाव?
उद्धव ठाकरेंनी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदाचा दिलेला प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला आहे. यामुळे ठाकरे बंधूंमधील तणाव वाढला असून, मनसेने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली आहे. या घडामोडीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला काही ठिकाणी नुकसान होण्याची, तर मुंबई महापालिकेत महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंमधील संबंधांना घेऊन पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी दिलेला प्रस्ताव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस असून, उद्या यावर मतदान होणार आहे. राज ठाकरेंनी हा प्रस्ताव फेटाळल्यामुळे मनसेने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसेने तटस्थ भूमिका घेतल्यामुळे काही ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नुकसान सोसावे लागू शकते. या तणावाचा फायदा मुंबई महापालिकेत महायुतीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वीकृत नगरसेवक पदावरूनही यापूर्वी ठाकरे बंधूंमध्ये मतभेद झाले होते. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेशी जवळीक वाढवल्याने उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. हा प्रस्ताव नाकारल्याने ठाकरे बंधूंच्या युतीत आणखी मिठाचा खडा पडला आहे.
