Pune Mordern School First Day | शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव! उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत
राज्यात आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 ला उत्साहात सुरुवात झाली असून, उन्हाळी सुट्टीनंतर शाळांच्या परिसरात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने वातावरण भारावून गेले आहे. शाळेची घंटा वाजताच राज्यभरातील लाखो विद्यार्थी नव्या उत्साहाने आणि आनंदाने शाळेत दाखल झाले.

मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, परळी, रत्नागिरी यांसह राज्यातील विविध भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत तसेच मिठाई वाटून त्यांचे स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये आकर्षक फुगे, रंगीत सजावट आणि पारंपरिक सनईच्या सुरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
पुण्यासह अनेक शहरांमध्ये दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक विद्यार्थ्यांनी मित्र-मैत्रिणी आणि शिक्षकांना पुन्हा भेटल्याचा आनंद व्यक्त केला.
शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्वागत समारंभ आणि विविध उपक्रमांद्वारे नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील शाळांमध्ये आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले असून, विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीनिशी शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.