Pratap Sarnaik | इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!, म्हणाले….
देशात इंधन दरवाढ आणि संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. एसटी महामंडळाच्या इंधन बचतीसाठी विशेष उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्यातील काही भागांमध्ये डिझेल पुरवठा कमी होत असल्याचं चित्र असताना एसटी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “एसटी महामंडळाला दररोज सुमारे 10 लाख 87 हजार लिटर डिझेलची गरज भासते. चार वेगवेगळ्या कंपन्यांकडून डिझेल पुरवठा केला जातो. हा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी संबंधित कंपन्यांना सूचना आणि विनंती करण्यात आली आहे.” तसेच एसटी महामंडळ दररोज 55 लाख प्रवाशांना सेवा देत असून कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना त्रास होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, वाढत्या डिझेल दरांमुळे एसटी महामंडळाने आता इंधन बचतीवर भर दिला आहे. “प्रत्येक आगारातून दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे दररोज जवळपास 1000 लिटर डिझेलची बचत होऊ शकते आणि सध्याच्या दरानुसार सुमारे 1 लाख रुपयांची आर्थिक बचत होईल,” अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
याशिवाय, चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीमुळे अतिरिक्त डिझेल खर्च होत असल्यास त्यांना समुपदेशन आणि प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बसेसची नियमित तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इंधन बचतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार आणि प्रोत्साहन योजना सुरू करण्याच्याही सूचना महामंडळ प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.