Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण…; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेनिमित्त अमृता फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर बहिणींना भेटवस्तू पाठवण्याची घोषणा केली आहे. पूर्वी आंदोलनामुळे अमृता फडणवीसांचे जेवणाचे निमंत्रण नाकारले होते. आता निमंत्रण नसतानाही आपल्या ऐपतीप्रमाणे भाऊबीज पाठवणार असल्याचे जरांगे पाटलांनी म्हटले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने एक महत्त्वाचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांनी निमंत्रण नसतानाही अमृता फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यासह आपल्या सर्व बहिणींना ऐपतीप्रमाणे भाऊबीजेची भेट पाठवणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वी जरांगे पाटील आंदोलनात असताना अमृता फडणवीस यांनी त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी जरांगे पाटील यांनी आंदोलनामुळे उपस्थित राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते आणि “भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन जेवायला येईन” असे म्हटले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, मी त्या टायमाला मैदानात होतो लढायला आणि त्या टायमालाच बहिणीनं बोलविलं. मैदान सोडता येत नसतं म्हणून गेलो नाही.
आता, भाऊबीजेसाठी कोणत्याही औपचारिक निमंत्रणाची वाट न पाहता, जरांगे पाटील यांनी स्वतःहून हा सलोख्याचा संदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. आता बोलावलेलं नाहीये. पण ठीक आहे आता बहिणीकडे पाठवून देऊ, तिन्ही बहिणीकडे पाठवून देऊ. आता ताईकडे पण पाठवून देऊ, अमृता ताईकडे पाठवून देऊ, सुनेत्रा ताईकडे पण भाऊबीज आपली पाठवून देऊ. आमच्या जे ऐपतीप्रमाणं आहे ती पाठवून देऊ भाऊबीजी, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा हा निर्णय राजकीय आणि सामाजिक स्तरावर एक प्रतीकात्मक संदेश देणारा मानला जात आहे.
