RajThackeray : राज ठाकरेंकडून प्रश्नांची सरबत्ती अन् आयोगानं मागितला वेळ अन् आज पुन्हा चर्चा, बैठकीत काय होणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेने निवडणूक आयोगाची भेट घेतली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांतील घोळ, व्हीव्हीपॅटचा वापर आणि बनावट नोंदणीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर निवडणूक आयोगाने विचार करण्यासाठी वेळ मागितला असून, आज पुढील बैठक होणार आहे.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्यासमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांतील घोळ, व्हीव्हीपॅटचा वापर न करणे आणि बनावट मतदार नोंदणी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. राज ठाकरे यांनी स्पष्टपणे विचारले की, मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत आणि व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका घेऊ नयेत. त्यांनी मतदार यादीत आढळणाऱ्या त्रुटी, जसे की एकाच मतदाराचे दोन ठिकाणी नाव असणे किंवा वडिलांचे वय मुलापेक्षा कमी दाखवणे, यावर चिंता व्यक्त केली.
तर उद्धव ठाकरे यांनीही बनावट मतदार नोंदणीवर कारवाई न झाल्याबद्दल प्रश्न विचारले. यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचा आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध न करून दिल्याने भाजपने निवडणुका कशा जिंकल्या, यावर संशय व्यक्त केला. विरोधकांनी व्हीव्हीपॅट नसल्यास मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली. या सर्व प्रश्नांवर निवडणूक आयोगाने विचार करण्यासाठी वेळ मागितला असून, आज पुन्हा बैठक होणार आहे.
