Sanjay Raut | मुंबईत भाजपचा महापौर बसणं हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल, राऊतांची खोचक टीका
“भाजपचा महापौर मुंबईवर येणं हा मुंबई शहरासाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस ठरेल. प्रत्येक मराठी मनासाठी हा ‘ब्लॅक डे’ असेल.” भाजपने मुंबईचे अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याचे काम केले असल्याची खोचक टीकाही राऊत यांनी केली. “भविष्यात मुंबई उद्योगपतींच्या हातात दिली जाईल,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच भाजपची भूमिका मुंबई कायमची स्वतंत्र करण्याशी संबंधित असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. मात्र सध्याच्या संख्याबळाचा विचार करता भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक असल्याने आगामी महापौर महायुतीतूनच निवडला जाईल, असे अनेक नेत्यांकडून ठामपणे सांगण्यात येत आहे. तर उपमहापौर पद शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळणार असून महापौर पद भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी निवडणूक लढवली जाणार की ती बिनविरोध होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, “भाजपचा महापौर मुंबईवर येणं हा मुंबई शहरासाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस ठरेल. प्रत्येक मराठी मनासाठी हा ‘ब्लॅक डे’ असेल.” भाजपने मुंबईचे अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याचे काम केले असल्याची खोचक टीकाही राऊत यांनी केली. “भविष्यात मुंबई उद्योगपतींच्या हातात दिली जाईल,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच भाजपची भूमिका मुंबई कायमची स्वतंत्र करण्याशी संबंधित असल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. “अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंच्या मदतीने भाजपचा महापौर महाराष्ट्राच्या राजधानीवर येणं हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद ठरेल,” असे म्हणत संजय राऊत यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
