Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
नाशिकमध्ये रस्त्यावर आडव्या टाकलेल्या पाईपला दुचाकी धडकून सिद्धार्थ गोरे या तरुणाचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत संतप्त कुटुंबीय आणि नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. महापौर हिमगौरी आडके यांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
नाशिकमध्ये रस्त्यावरील निष्काळजीपणामुळे आणखी एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. सिद्धार्थ गोरे नामक तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळ सुरू असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कामादरम्यान रस्त्यात आडवे टाकलेल्या काळ्या पाईपला त्याची दुचाकी धडकली. अंधारात हे पाईप न दिसल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात सिद्धार्थ गोरे जागीच मरण पावला, तर त्याचा मित्र मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी झाला.
या अपघातानंतर संतप्त कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी सिद्धार्थचा मृतदेह थेट नाशिक महापालिका मुख्यालयात आणून जोरदार घोषणाबाजी केली. दोषींवर कारवाई करा, अशी मागणी करत नागरिकांनी महापालिका आणि ठेकेदाराला या मृत्यूसाठी जबाबदार धरले. पालिकेच्या प्रवेशद्वारावर मृतदेह ठेवून नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. या घटनेनंतर महापौर हिमगौरी आडके यांनी सिद्धार्थच्या कुटुंबीयांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. रस्त्यावर काम सुरू असताना कोणतीही सुरक्षितता न बाळगल्याने हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे यापूर्वीही बळी गेले आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
