कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…

कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…

| Updated on: Aug 24, 2026 | 2:22 PM

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी रिक्षाचालकांना मराठी अस्मितेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. मराठी शिकण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल; अन्यथा लायसन्स निलंबनाची कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कांदिवलीतील मराठी रिक्षाचालकाला मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुजोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

कांदिवली येथे अमराठी रिक्षाचालकांकडून मराठी रिक्षाचालकाला मारहाण झाल्याच्या आणि रस्ता रोकोच्या घटनेनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी रिक्षाचालकांना महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचे आणि मराठी भाषेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. कोणीही बेकायदेशीरपणे कारवाई केली जाणार नाही, अशी हमी देतानाच, मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना एक महिन्याची मुदत दिली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

या मुदतीत मराठी न शिकल्यास तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित केले जाईल आणि त्यानंतरही सुधारणा न झाल्यास लायसन्स रद्द करण्याची कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. संजय निरुपम आणि शशांक राव यांनी या मोहिमेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सरनाईक यांनी आभार मानले. ते म्हणाले की, हे सरकार रोजगार देणारे आहे, हिरावून घेणारे नाही. मात्र, कोणीही महाराष्ट्रात राहून, येथे व्यवसाय करून मराठी अस्मितेचा अनादर करत असेल किंवा ‘तुमको जो करने का हो करो’ अशी मुजोरी करत असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही. अशा मुजोरी करणाऱ्यांवर परिवहन मंत्री म्हणून कठोर कारवाई करावीच लागेल, असा इशारा सरनाईक यांनी दिला.

Published on: Aug 24, 2026 2:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us