Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणी नवे आरोप समोर आले आहेत. मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत लग्न जमवणाऱ्या मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. लोहगडावर केतन अग्रवाल यांची हत्या झाल्याप्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणी नवे आरोप समोर आले आहेत. मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत लग्न जमवणाऱ्या मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. लोहगडावर केतन अग्रवाल यांची हत्या झाल्याप्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, आज पत्रकार परिषदेत बोलताना विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणामागे आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो, असा संशय व्यक्त केला.
विशाल अग्रवाल म्हणाले की, लग्न जमवणाऱ्या मित्तल कुटुंबीयांनी सिया गोयलबाबत चुकीची माहिती देत ती संस्कारी असल्याचे सांगितले. सियाबाबतची खरी परिस्थिती माहिती असूनही त्यांनी हे लग्न ठरवले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात त्यांचीही भूमिका तपासली जावी आणि त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणीही केली. “मी माझ्या मुलाचे २६ वर्षे संगोपन केले. अशा प्रकारची घटना पुन्हा कोणाच्याही आयुष्यात घडू नये. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात होऊन आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी,” असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सिया गोयलच्या पालकांच्या भूमिकेवरही विशाल अग्रवाल यांनी प्रश्न उपस्थित केले. “एकीकडे ती दोषी असेल तर तिला लोहगडावरून ढकलून द्या असे सांगितले जाते, तर दुसरीकडे तिच्या बचावासाठी वकील बदलले जात आहेत. हा स्पष्ट दुटप्पीपणा आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात मित्तल कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विशाल अग्रवाल यांनी केली असून, पोलिसांकडून हत्येच्या सर्व पैलूंचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
