राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर पवारांचं जंतरमंतर म्हणत पुन्हा टीका केली आहे. जुलै २०२३ मधील राष्ट्रवादीच्या फुटीचा संदर्भ देत, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील चिखलावर चिंता व्यक्त केली. पहिली टीम सत्तेत गेली असून दुसरीही लवकरच जाईल, असे भाकीत त्यांनी केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा तीव्र शब्दांत टीका केली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीला जंतरमंतर असे संबोधत, त्यांनी ही टीका केली असून याआधीही आपण हे म्हटले होते असे स्पष्ट केले आहे. डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी केलेली एक जुनी पोस्ट पुन्हा चर्चेत आणली आहे. त्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी म्हटले होते की, आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील दिगू टिपणीस झाला.
उद्धव ठाकरेंचे ओझे शरद पवारांना उतरवायचे होते, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली असून, यथावकाश दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईल, असे भाकीत त्यांनी केले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या चिखलावर राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता हे किळसवाणे राजकारण बंद पाडेल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
