Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
गोकुळ दूध संघातील अध्यक्ष निवडीवरून राजकीय पेच निर्माण झाला आहे. सरकारने चार शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला असून, सतेज पाटलांनी याला न्यायालयात आव्हान दिले आहे. चुकीच्या पद्धतीने सत्ता मिळवून काय मिळणार, असा सवाल रवींद्र धंगेकरांनी विचारला आहे. राज ठाकरेंनी भाजपवर रडीचा डाव खेळत लोकशाहीचा गळा आवळल्याचा आरोप केला आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेल्या पेचामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने गोकुळवर चार शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याने नवा वाद सुरू झाला आहे. या निर्णयाला सतेज पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले असून, 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिल्याचे ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले यांनी सांगितले. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सल्ला घेतल्याचा दावाही गणबावले यांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी “चुकीच्या पद्धतीने सत्ता मिळवून काय मिळणार?” असा सवाल उपस्थित करत सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गोकुळमध्ये अध्यक्ष निवडण्यासाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक असतो, मात्र नव्याने नियुक्त केलेल्या सदस्यांमुळे हा कोरम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. गोकुळमध्ये “रडीचा डाव” खेळला जात असल्याचे सांगत, लोकशाही वाचवण्याचे मोर्चे काढणारे सत्ताधारीच लोकशाहीचा गळा आवळत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपने पराभव स्वीकारून रडीचा डाव खेळणे थांबवावे, असे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे.
