मतदारांची नावे यादीतून गायब? रोहित पवारांकडून थेट ऑडिओ क्लिप पोस्ट, भाजपवर गंभीर आरोप!
रोहित पवारांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत भाजपने विरोधी मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने रडीचा डाव खेळल्याचा दावा रोहित पवार करत आहेत, तर नवनाथ बन यांनी हे आरोप फेटाळले आहेत. टीव्ही ९ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते रोहित पवार यांनी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपने निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी विरोधी पक्षांच्या मतदारांची नावे मतदार यादीतून हेतुपुरस्सर वगळल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपने रडीचा डाव खेळून सत्ता मिळवल्याचा दावा करत पवार यांनी ही ऑडिओ क्लिप त्याचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. या ऑडिओमुळे या सरकारला मतदारांनी नव्हे, तर मतांची चोरी करून सत्तेचा इमला उभारला असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे पवार म्हणाले.
या ऑडिओ क्लिपमध्ये मतदार यादीतून नावे वगळण्याबाबत संवाद ऐकू येत आहे. यात एका व्यक्तीला भाजप कार्यालयातून आलेल्या कागदपत्रांवर सह्या करायला लावल्याचा उल्लेख आहे. मात्र, टीव्ही ९ मराठी या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहत नाही. दरम्यान, नवनाथ बन यांनी रोहित पवारांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इंदापूर तालुक्यात हजारो मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे पवार समर्थकांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाने पात्र मतदारांना संधी उपलब्ध करून दिल्याचे आणि कुठल्याही राजकीय पक्षाला अशा प्रकारे नावे वगळता येत नसल्याचे विरोधी बाजूने म्हटले आहे.
