Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या माघारीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीपासूनच ठाकरे गटाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने ही निवडणूक लढवू नये, अशी भूमिका आपण घेतली होती, असे सांगताना राऊत यांनी काही उमेदवारांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष नेतृत्वाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या माघारीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सुरुवातीपासूनच ठाकरे गटाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने ही निवडणूक लढवू नये, अशी भूमिका आपण घेतली होती, असे सांगताना राऊत यांनी काही उमेदवारांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष नेतृत्वाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र ऐनवेळी काही उमेदवारांनी माघार घेतल्याने पक्ष नेतृत्वाला धक्का बसला आहे. “वैयक्तिक स्वार्थासाठी आणि पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून माघार घेण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
कोकणातील घडामोडींवर बोलताना राऊत यांनी अप्रत्यक्षपणे बाळ माने यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, एका उमेदवाराने मातोश्रीवर येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज घेतला. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले, हिंदुत्वाच्या विचारांची भाषा केली, मात्र नंतर घेतलेली भूमिका ही पक्षनिष्ठा आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी राऊत यांनी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या काही नेत्यांवरही टीका केली. “स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक आज गद्दारी आणि बेईमानी करण्यासाठी एकत्र आले आहेत,” असा घणाघात त्यांनी केला.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या माघारीमुळे आणि त्यानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
